Download App

Sushma Andhare : फडणवीसांना कुठल्या गुन्ह्याची भीती वाटते?; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

पुणे : देवेंद्र फडणवीस यांना नेमक्या कुठल्या गुन्ह्यांची भीती वाटतेयं, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnvis) केला आहे. अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीसांनी मला आत टाकण्याचा डाव होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपावर आता सुषमा अंधारेंनी फडणवीसांना रोखठोक प्रत्युत्तर दिलंय.

अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्रिपदाला किती अधिकार असतात हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहित आहे. जेव्हा मुख्यंमंत्रीपदावर उध्दव ठाकरे होते तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आत टाकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी काही केलेलं नाही तर त्यांना कशाची भीती वाटत आहे. त्यांनी नेमका कुठला गुन्हा केला आहे. मुख्यमंत्रीपदावर असताना ठाकरेंना देवेंद्रजींना आत टाकणं किती सोपं होतं. पण त्यांनी तसं केलेलं नाही. शिवसेना भाजपसारख्या कुटकारस्थान करणारी नाही.

कपटी राजकारण करण्याची शिवसेनेला कधीच गरज पडली नाही. शिवसेनेत जे दिसत असतं तेच शिजत असतं. याउलट सर्व केंद्रीय यंत्रणा भाजपच्या हाता असताना अनिल देशमुख यांना कोणी आतमध्ये टाकलं. या प्रकरणात सीबीआयला न्यायालयाकडून फटकारण्यातही आलं होतं, असं म्हणत त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

त्याचप्रमाणे संजय राऊतांना कोणी आतमध्ये टाकलं? हे सगळं कुणी केलं? प्रताप सरनाईक जेव्हा महाविकास आघाडीत होते, तेव्हा त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा कोणी लावला होता. त्या काळात त्यांना मानसिक ताण कोणी दिला होता? ते सर्व तपास आता का थांबलेत? आता देवेंद्रजी तुम्हीच उत्तर द्या, न्यायालयाला सर्वोच्च मानायचं की किरीट सोमय्यांना. त्यांच्याकडं हे बळ कुठुन येतंय? असा सवाल उपस्थित करत त्यांना भाजपच्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरलंय.

तसेच अंधारे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं होतं की, मी बदला घेतलायं. देवेंद्र फडणवीस तुम्ही सुडाचं राजकारण करण्यात माहेर आहात, त्यावेळची सर्व प्रकरणं थंड पडली आहेत. संजय राठोडांना आत टाकण्याची तुम्ही पूर्ण तयारी केलीय होती. आम्ही त्यांचा राजीनामा घेतला होता,देवेंद्र फडणवीस सोयीनुसार रंग बदलत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी फडणीसांवर केला आहे.

दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांचा राज्यभर दौरा सुरु असून त्यांच्या महाप्रबोधन यात्रेला राज्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे विरोधकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टीका-टिपण्या करीत आहेत. त्यावर विरोधकांकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत असून आता थेट पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतल्याचं दिसून आलंय.

Tags

follow us