भाजप कुणाला संधी देणार ? विधानपरिषदेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

Maharashtra Legislative Council Election-भाजपकडून विधानपरिषदेवर जाण्यासाठी शंभराहून अधिक जण इच्छुक

BJP

BJP

Maharashtra Legislative Council Election: विधानसभा सदस्यातून विधानपरिषद सदस्य (Maharashtra Legislative Council Election) निवडण्यासाठी निवडणूक जाहीर झालीय. काही सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने आणि काही सदस्य निवृत्त झाल्याने नऊ जागांवर निवडणूक होणार आहेत. महायुतीत भाजपचे (BJP) सर्वाधिक 131 आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडून पाच, शिंदेसेनेचे 57 आमदार असल्याने दोन जण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक जण विधानपरिषदेवर सहज निवडून जाऊ शकणार आहेत. महाविकास आघाडीकडून केवळ एक जण विधानपरिषदेवर जाऊ शकतो. भाजपकडून विधानपरिषदेवर जाण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. शंभराहून अधिक जण विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहे. त्यातील काही नावे समोर येत आहे.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी नागपूरचे संजय जोशी, संजय केनेकर, दादाराम केचे हे पुन्हा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय जोशी यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केलेले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, महिला मोर्चाच्या नेत्या माधवी नाईक यांची नावे चर्चेत आहे. राम सातपुते यांची पत्नी संस्कृती या जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत. त्यामुळे राम सातपुते यांच्या नावाचा भाजप किती विचार करू शकत नाही, असे बोलले जात आहे. सोलापूरमधील रणजितसिंह मोहिते पाटील विधानपरिषदेवर निवृत्त झालेले आहेत. ते भाजपकडून विधानपरिषदेवर गेले होते. परंतु आता मोहिते कुटुंब हे राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणं अवघड आहे. सोलापूरमधील एक जण विधानपरिषदवर निवडला जाऊ शकतो. त्यात माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर किंवा राम सातपुते असे पर्याय मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आहेत.

पुण्यातून जगदीश मुळीक यांचे नाव चर्चेत

पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक हेही भाजपकडून इच्छुक आहेत. जगदीश मुळीक भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आहे. तसेच 2014 ला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झालेले आहेत. 2024 ला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने जगदीश मुळीक यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे तेही आता विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत.

विवेक कोल्हे, तनपुरे कुणाला संधी मिळणार ?

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावचे विवेक कोल्हेही भाजपकडून इच्छुक आहे. त्यांना विधानसभेच्या वेळी राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द भाजपकडून मिळाला होता. परंतु राज्यसभेवर संधी मिळाली नाही. आता ते विधानपरिषदेसाठी इच्छुक आहे. तसेच राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळेते ही विधानपरिषदेसाठी इच्छुक असणार आहेत.

कोल्हापुरातून अनेक जण इच्छुक

भाजपचे इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर ही विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत. राहुल आवाडे यांच्यासाठी मागील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी थांबण्याची तयारी केली होती. व्हा त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. जिल्ह्यातील नेते चंद्रकांत पाटील यांनीही गेल्या महिन्यात इचलकरंजीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना संधी देणार असल्याचा पुनरुचार केला. यामुळे या स्पर्धेत हाळवणकर आघाडीवर आहेत. तसेच कोल्हापूर उत्तरमधून 2014 ला विधानसभा लढलेले महेश जाधव हेही भाजपकडून इच्छुक आहेत. तर कागलचे शाहू सहकार समूहाचे समरजितसिंह घाटगे यांनी भाजपात घरवापसी केली आहे. त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे तेही इच्छुक आहेत.

भाजपकडून विधानपरिषदेवर जाण्याची इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अंतिम नावे निवडताना मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप श्रेष्ठींची कसोटी लागणार आहे हे नक्की.

Exit mobile version