Download App

सिद्धरामय्या मुख्यमंत्री : शिवकुमारांचं खच्चीकरण की काँग्रेसची राजकीय खेळी?

दिल्ली : कर्नाटकपासून दिल्लीपर्यंत तब्बल 100 तास चाललेल्या विचारमंथनानंतर अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेत सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या डी. के. शिवकुमार यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोघेही 20 मे रोजी शपथ घेणार आहेत. (Why congress not make cm to dk shivkumar? What is reason?

वेणुगोपाल यांच्या मते, राज्यात शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असणार आहेत. सोबतच त्यांच्यावर अनेक महत्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसकडून डीके शिवकुमार यांना आणखी एक मोठी ताकद देण्यात आली आहे. ते 2024 पर्यंत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. याचा अर्थ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्ष मजबूत ठेवण्याची जबाबदारी डीके शिवकुमार यांच्यावर असणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्र्याचा चेहरा घोषित केला नव्हता. मात्र, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही वेळोवेळी मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा सांगत होते. निकालानंतर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोघांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. अखेर काँग्रेस हायकमांडाने सिद्धरामय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री पदाच्या खाली काहीही स्वीकारण्यास तयार नव्हते, पण सोनिया गांधींच्या मध्यस्थीनंतर त्यांनी होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

पण या सगळ्या विचार मंथनादरम्यान सिद्धरामय्या शिवकुमारांपेक्षा का सरस ठरले? मुख्यमंत्रीपदापासून लांब राहण्यात शिवकुमार यांना कोणती गोष्ट आडवी आली? हे पाहणं महत्वाचं आहे.

1. सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ – सिद्धरामय्या हे यापूर्वीही कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1978 मध्ये डी. देवराज अर्स यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ (2013-2018) पूर्ण करणारे ते कर्नाटकचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

2. सिद्धरामय्या यांची लोकप्रियता – एक नेता म्हणून सिद्धरामय्या यांची लोकप्रियता कर्नाटकात सर्वत्र आहे. एकप्रकारे ते काँग्रेसचे गर्दी खेचणारे नेते म्हणून ओळखले

3. जातीय समीकरण : सिद्धरामय्या कुरुबा या कर्नाटकातील प्रमुख ओबीसी समुदायातून येतात. यासोबतच त्यांनी विविध समुदायांना काँग्रेससोबत जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

4. आमदारांचा पाठिंबा- बहुतेक आमदार सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याच्या समर्थनात आहेत. सिद्धरामय्या यांना  जवळपास 90 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

5. सिद्धरामय्या यांची शेवटची निवडणूक- सिद्धरामय्या म्हणाले होते की, यावेळी त्यांची शेवटची निवडणूक होणार आहे. यानंतर ते निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होणार आहेत.

शिवकुमार यांना कोणती गोष्ट आडवी आली?

1. आमदारांचा पाठिंबा- शिवकुमार यांना सिद्धरामय्या यांच्या तुलनेत अत्यंत कमी आमदारांचा पाठिंबा होता. काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या अहवालानुसार शिवकुमार यांना केवळ 34 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं आहे.

2. जातीय समीकरण : डीके शिवकुमार यांचा प्रभाव दक्षिण कर्नाटक आणि मुख्यतः वोक्कलिगा समुदायापुरता मर्यादित आहे.

3. शिवकुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे खटले – डीके शिवकुमार यांच्यावर आयकर चोरी आणि मनी लाँड्रिंगचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मनी लाँड्रिंगच्या आरोपांवरील ईडीचे आरोपपत्र आणि बेहिशोबी मालमत्तेची सीबीआयची चौकशी यांचा समावेश आहे. शिवकुमार यांना ED ने सप्टेंबर 2019 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक देखील केली आहे. एका महिन्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

4. शिवकुमार यांची पक्षाप्रती ठाम निष्ठा : काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनविताना त्यांच्या अखेरच्या निवडणुकीचाही विचार केला असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवकुमार हे आतापर्यंत पक्षाप्रती ठाम आणि पूर्ण निष्ठा दाखवून आहेत. त्यामुळे त्यांना अडीच वर्षांनंतर किंवा पुढील वर्षी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

5. लोकसभा निवडणूक : पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर संघटनेसाठी शिवकुमार यांच्यासारखा कणखर नेता आवश्यक असल्यानेच त्यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यास हायकमांड अनुकूल नव्हते असे सांगण्यात येत आहे. त्याचमुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.

Tags

follow us