Download App

सत्यजित तांबेंवर भाजपचं एवढं प्रेम का?

नाशिक : पदवीधर मतदासंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळालाय. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी गेम पलटी केल्याचं दिसून आलं. पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारत त्यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना जणू काही आनंदच झाल्याचं चित्र राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर दिसून येतंय. सर्वात आधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया दिलीय. त्यांनतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही पाठिंबा देऊ असं जाहीर केलंय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. अद्याप भाजपकडून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला नसून मात्र, भाजपकडून सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे जाहीर पाठिंबा दिल्याचं समजतंय.

अखेर मागील 20 वर्षांपासून कॉंग्रेसचे एकनिष्ठ समजले जाणारे तांबे पिता-पुत्रांकडून उमेदवारीबाबत असा गेम खेळण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय. दरम्यान, भाजपचं सत्यजित तांबे यांच्यावर एवढं प्रेम का उतू चाललंय, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

भाजपने राज्यातील पाचही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेआधीच जाहीर केले होते. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सस्पेंस ठेवण्यात आला होता. अखेर भाजपचा हा संस्पेस आता संपल्याचं दिसून येत असून सत्यजित तांबेंच भाजपचे उमेदवार असणार काय? सुधीर तांबेंचा अर्ज न भरता सत्यजित तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल करण्यामागे भाजपची कोणती रणनीती आहे काय? यासोबतच इतरही प्रश्न गुलदस्त्यातच आहेत. येत्या 30 तारखेला होणाऱ्या या मतदानानंतर काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असं भाकीत वर्तवण्यात येतंय.

Tags

follow us