Pune news : भारत हा ज्ञानाचा खंड आहे. नालंदा विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. आजही भारतातील युवक अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात विविध क्षेत्रांत आपले वर्चस्व निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे संस्कार हा शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आयुष्यात घडण्यासाठी आई-वडील आणि गुरुजनांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात, असे मत ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व रांका ज्वेलर्स प्रा. लि.चे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे १०व्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नऱ्हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल-१ येथे करण्यात आले. यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. रांका ज्वेलर्स प्रा. लि.चे अध्यक्ष फत्तेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे डॉ. संजीव सोनवणे यांना आदर्श कुलगुरू पुरस्कार, मराठवाडा मित्र मंडळ, डेक्कन जिमखाना, पुणेचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना आदर्श संस्थापक पुरस्कार, ग. तु. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, नंदुरबारचे डॉ. महेंद्र रघुवंशी यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग सदगीर यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. शिक्षक दिन आणि संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
विश्वेश कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपण कोण आहोत आणि आपली क्षमता काय आहे, याचे विश्लेषण केले पाहिजे. दुसऱ्यांकडे पाहून त्यांची नक्कल करण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची कुवत ओळखली पाहिजे. कंपन्यांना केवळ पदवीधर नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले मनुष्यबळ हवे आहे. त्यामुळे अनुभवाधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. देशात कामासाठी मनुष्यबळ मिळत नसल्याची परिस्थिती असताना बेरोजगारी हा विषय केवळ सामाजिक किंवा राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिला आहे. शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असून, केवळ टक्केवारीला महत्त्व न देता विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक मानसिकता विकसित केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, विकसित भारताच्या निर्मितीसाठी सक्षम मानवी भांडवल विकसित करण्याची गरज आहे. हे मानवी भांडवल देशाच्या विकासात योगदान देईल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. पराग सदगीर म्हणाले, शिक्षकाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम होतील.
ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, आई-वडिलांनंतर आपल्या जीवनात सर्वांत महत्त्वाची भूमिका शिक्षकांची असते. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद शिक्षक देतात. शिक्षक केवळ अक्षरांची ओळख करून देत नाहीत, तर योग्य-अयोग्याची जाणीव करून देतात आणि स्वप्नांसाठी संघर्ष करण्याची शिकवण देतात. शिक्षकांमुळे समाज घडत आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे शिक्षक कमी दिसतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी प्रयत्न करणारे अधिक दिसतात, ही आजची सत्य परिस्थिती आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य भाऊसाहेब जाधव आणि डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.
