पुणे : गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीमागील नेमके कारण काय हे समोर येत नव्हते. त्यामुले माध्यमांनी आणि लोकांनी वेगवेगळ्या कारणांचा अंदाज बांधला. पण ही भेट नक्की कशासाठी झाली याचे कारण आता समोर आले आहे. अतुल चोरडिया यांच्या 3 हजार कोटींच्या टीडीआरसाठी ही भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. दैनिक पुढारी या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Ajit Pawar and Sharad Pawar met for Atul Chordia’s 3 thousand crore TDR proposal)
अजितदादा आणि शरद पवार यांची ‘गुप्त भेट’ राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला. या भेटीचे कारण ना अजितदादांनी दिले ना शरद पवारांनी सांगितले. माध्यमांनी, लोकांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार शरद पवार यांनी भाजपसोबत यावं, यासाठी अजितदादा प्रयत्न करत असावेत असा कयास बांधला. दिल्लीतूनही शरद पवार यांना ऑफर देण्यात आली होती, अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या.
अगदी अमित शाहंनी या भेटीसाठी प्रयत्न केले असाल्याचे दावे करण्यात आले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली. त्यामुळे हेही कारण या भेटीमागे असावे, असा अंदाज बांधला. मात्र आता ही भेट अतुल चोरडिया यांच्या 3 हजार कोटींच्या टीडीआर प्रस्तावाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी झाली असावी असे सांगितले जात आहे.
पुण्यातील मुळामुठा संगमावरील संगमवाडी येथील सिटी सर्व्हे क्रमांक ९३ मध्ये (नाईक बेट) चोरडिया यांचा 32 एकर, 22 गुंठे जागेचा भूखंड आहे. दाट झाडी असलेल्या या बेटावर कोणतीही वस्ती नाही. पावसाळ्यात अनेकदा या बेटाचा काही भाग पाण्याखाली जातो. महापालिकेने 2013 मध्ये जुन्या हद्दीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. त्या वेळी तेथे शेतीऐवजी उद्यानाचे आरक्षण टाकले होते.
दरम्यान, उद्यानासाठी आरक्षित असलेली ही जागा महापालिकेच्या ताब्यात देऊन चोरडिया त्या बदल्यात शहरात इतर ठिकाणी ‘टीडीआर’ घेणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत सुरू होती. या टीडीआरचे बाजारमूल्य 3 हजार कोटींच्या घरात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी पालिकेच्या विधी विभागाने जाहीर प्रकटन काढून ‘टीडीआर’च्या प्रस्तावावर हरकती मागविल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने ‘टीडीआर’ देण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला असल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र शहरावर मोठा परिणाम होणार असल्याचा दावा करत या ‘टीडीआरला’ दबक्या आवाजात विरोध होऊ लागला. परिणामी हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी चोरडिया प्रयत्न करत असल्याचे बोलले जात होते. मात्र चोरडिया यांनी नुकतेच महापालिकेला पत्र देऊन ‘टीडीआर’ची फाइल मागे घेतली आहे. यामागचे नेमके कारण समजू शकले नसले तरी ‘टीडीआर’ देण्यासंदर्भातील पुढील कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याची माहिती बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे.