Ajit Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मागील सरकारमधील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवर बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला सुनावले आहे.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले…
अजित पवार म्हणाले, पक्षातील आमदार आपल्याला सोडून जाणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांना वाटत होते. आमदार सोडून जाणे त्यांच्यासाठी एक मोठा शॉक होता. पंधरा-सोळा आमदार सुरतला गेले होते. त्यानंतरही 35 आमदार ठाकरे यांच्याबरोबर होते. त्यात गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत हे वर्षा बंगल्यावर येत-जात होते. त्यात काही अपक्ष आमदार होते. पण त्यानंतर सुरत, गुवाहाटीला कसे आमदार गेले ते आपण पाहिले आहे.
अजित पवार थेट बोलले, 2024 कशाला, आत्ताच मुख्यमंत्री होऊ शकतो…
हे सांगत असताना अजित पवार यांनी 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीची सल बोलून दाखविले आहे. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो. परंतु त्यानंतर कोणीही पक्षातून फुटले नाही. त्यावेळी सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे जबरदस्त काम झाले होते. असेच जबरदस्त काम तिन्ही पक्षाने केले असते. तर सरकार पडले नसते. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री दिसले असते, असे पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मोकळीक दिली होती. त्यामुळे ठाणेचे पोलिस आयुक्त व इतर अधिकारी मर्जीतले नेमण्यात आले होते. त्या अधिकाऱ्यांनीही शिंदेंना मदत केल्याचा दावाही अजित पवार यांनी केला आहे.