Download App

Ajit Pawar पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाही… ‘भाजप’ला सहानुभूती दाखवणार नाही!

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) म्हणाले की, चिंचवड जागेसाठी उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण एकमत झाले नाही. सकाळी सर्वांशी बोललो. त्यानंतर विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. ते जाहीर केले. राहुल कलाटे उभे राहणार असले तरी आमचा अजूनही एकमत करण्याचा प्रयत्न आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाही. सहानुभूतीचा कोणताच विषय नाही. तीन निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला सहानुभूती दिसली नाही. फक्त मुंबईमध्ये त्यांनी उमेदवार शेवटच्या क्षणी दिला नाही. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा राहील असे सांगितले आहे. या शहरातून माझी राजकीय सुरुवात झाली आहे. त्यावेळी मी देशात पहिल्या क्रमांकाची मते घेतली होती. या शहराचा कायापालट केला आहे. त्यामुळे विजय आमचाच होणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

नाना काटे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पिंपळे सौदागर येथून थेरगावमधील क्षेत्रीय कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी आमदार अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी खूप जण इच्छुक होते. मी सर्वांशी चर्चा केली, त्यातून मार्ग निघावा हा हेतू होता. मी अनेक वेगवेगळे पर्याय दिले पण एकमत झाले नाही. पुन्हा आज सकाळी परत एकदा सर्वांशी बोललो. त्यानंतरच विठ्ठल (नाना) काटे यांच्या नावावर एकमत झाले.

follow us