Prashant Jagtap Emotional Post For Ajit Pawar : महाराष्ट्राचे लाडके “दादा” आदरणीय अजितदादा पवार यांचे निधन हा माझ्यासह तमाम महाराष्ट्राला बसलेला धक्का आहे. दोनच दिवसांपूर्वी दादांच्या अंत्यविधीला मी उपस्थित होतो, परंतु आज दादा आपल्यात नाही ही बाब मान्य करण्यास मन अजूनही धजावत नाही, म्हणूनच आज पुन्हा एकदा ज्याठिकाणी दादांना मुखाग्नी देण्यात आला त्याठिकाणी नतमस्तक होत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दादांच्या असंख्य आठवणी मनात दाटून आल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगत भावनांना वाट मोकळी करून दिलीये.
जगताप यांची पोस्ट काय?
१० जून १९९९ ते १ जुलै २०२३… तब्बल २४ वर्षे मी आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय राहिलो. या संपूर्ण काळात दादांचं मार्गदर्शन आणि पाठबळ मला मिळालं. विचारांवरील माझी निष्ठा, जनतेच्या हितासाठी असलेली माझी तळमळ पाहून दादांनी मला पक्ष संघटनेत, महानगरपालिकेत महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. आयुष्यातील अडचणीच्या काळात ज्यांनी नेहमीच माझ्या पाठीवर हात ठेवला असे दादा आज आपल्यात नाहीत. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिघात व माझ्या वैयक्तिक जीवनातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. २ जुलै २०२३ रोजी दादांनी वेगळी राजकीय वाट निवडली, त्यावेळी मी पुरोगामी विचारांवर निष्ठा ठेवून भाजपाला साथ न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळपास ३ वर्षांच्या काळात मी स्वतः कधीही अजितदादांच्या बाबतीत मनात आकस ठेवला नाही. प्रशांत जगतापला आपण संधी दिली आणि प्रशांत जगताप आता आपल्या सोबत नाही म्हणून आदरणीय अजितदादांनीही कधीच मनात आकस ठेवला नाही, कुठेही याबद्दल वक्तव्य केलं नाही. २४ वर्षांच्या वाटचालीत आमच्यात निर्माण झालेल्या नात्याचा हा परिपाक होता. अजितदादांच्या मनाचा हा मोठेपणा आयुष्याच्या अखेरपर्यंत माझ्या स्मरणात असेल.
“प्रशांत… हे तू चुकीचं केलंस, तू माझ्यापासून हे का लपवलं?”
आजपर्यंतच्या वाटचालीत अजितदादांसोबत माझे शेकडो फोन कॉल झाले असतील, अनेक वेळा त्यांच्या कार्यालयात, निवासस्थानी, पक्ष कार्यालयात बैठका झाल्या असतील, प्रत्येक वेळी दादांनी मला “आपला माणूस” म्हणून सन्मानाची वागणूक दिली हे मी माझे भाग्य समजतो. एखादा नेता आपल्या कार्यकर्त्यावर किती जीवापाड प्रेम करू शकतो याचा मूर्तीमंत उदाहरण होते “अजितदादा”… जून २०२२ मध्ये माझा चेहरा पॅरालाईज झाला, तेव्हा जवळपास १५ दिवस मी ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली, १५ दिवस मी चेहऱ्याला मास्क आणि गॉगल लावूनच होतो. अखेर मोठ्या धैर्याने मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही बाब जगासमोर मांडली. सायंकाळी ७ वाजता मी हे फेसबुक लाईव्ह केलं आणि रात्री ११.३० वाजता मला आदरणीय अजितदादांचा देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून कॉल आला. “प्रशांत… हे तू चुकीचं केलंस, तू माझ्यापासून हे का लपवलं?” असं म्हणून दादांनी मला बोल सुनावले, त्यांच्या या रागवण्यामागील आपुलकीची व आपलेपणाची भावना तेव्हाही माझ्या मनाला स्पर्श करून गेली. “काळजी घे आणि उद्याच सकाळी मुंबईला ये” असा दादांनी दिलेला आदेश मी पाळला.
मास्क काढ अन् मला तुझा चेहरा बघू दे
दुसऱ्या दिवशी सकाळीच मी मुंबईत अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचलो. आतमध्ये अजितदादा व एकनाथराव खडसे यांची बैठक चालू असल्याने मी बाहेरच बसलो, हे दादांना कळताच दादांनी मला आज बोलावून घेतले. त्यावेळी ही माझ्या चेहऱ्यावर मास्क, “प्रशांत मास्क काढ, मला बघू दे चेहरा” असं दादांनी म्हणतच मी मास्क काढला. माझा चेहरा पाहताच दादांनी अतिशय काळजीच्या स्वरात मला रागवण्यास सुरुवात केली, तू पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलास तरी माझा जवळचा माणूस आहेस, स्वतःची तब्येत बरी नसताना तू मला काहीही न सांगता पक्षाचं काम करतोय, बैठका घेतोय हे काही बरोबर नाही असं दादांनी नाराजीच्या स्वरात सांगितलं. पुढच्याच मिनिटाला दादांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला, “प्रशांत माझा घरातला माणूस आहे, त्याच्यावर सर्वोत्तम औषधोपचार करा पण काहीही करून त्याला बरा करा” असं दादांनी फोनवरून डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर तातडीने मला डॉक्टरांकडे जायला सांगून स्वतःच्या PA ना माझ्यासोबत पाठवलं. माझ्या कणखर नेत्याच्या आत दडलेला एक हळवा माणूस त्यावेळी मी अनुभवला.
नाहीतर मी रॅली सोडून निघून जाईल
माझ्यावर औषधोपचार सुरू असताना काही महिन्यातच कसब्याच्या आमदार स्व. मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली. महाविकास आघाडीच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली, धंगेकरांचा प्रचार करण्यासाठी अजितदादांची रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीत मी स्वतः अजितदादांसोबत जीपवर होतो. अजितदादांच्या या रॅलीला कार्यकर्त्यांची व पुणेकरांची प्रचंड गर्दी झाली, या गर्दीमुळे रॅली अतिशय संथ गतीने पुढे जात होती. दादांनी मला सांगितलं “प्रशांत, खूप जास्त ट्राफिक झालं आहे, मला पुढच्या कार्यक्रमाला उशीर होतोय. जरा बघ काय झालंय !”… मी लगेच जीप वरून खाली उतरून समोरील वाहतूक कोंडी सोडवण्यास सुरुवात केली, जशी जशी वाहतूक कोंडी सुटेल तसा तसा पुढे धावत जाऊन मी पुढची वाहतूक मोकळी करत होतो. पुढे जीपचा मार्ग मोकळा झाल्यानंतरही पुढे वाहन आडवे येऊ नये म्हणून मी जीपच्या समोर पळत होतो. जीपवर उभ्या असलेल्या अजितदादांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी मोठमोठ्याने मला अनेकदा आवाज दिला. मात्र, दादांना पुढच्या प्रवासाला उशीर व्हायला नको म्हणून मी जीपसमोर पळतच राहिलो. त्यानंतर मात्र दादांनी चिडून ड्रायव्हरला जीप थांबावायला सांगितली, जीप थांबली म्हणून मीही थांबलो. तेव्हा दादांनी मला बोट करून रागाच्या स्वरात सांगितलं, “प्रशांत आत्ताच्या आत्ता जीपवर ये, नाहीतर मी रॅली सोडून निघून जाईल”. दादांचा राग पाहून मी मुकट्याने जीप वर चढलो, वर चढल्यानंतर दादांनी मला पुन्हा रागवायला सुरुवात केली.. पण यावेळी रागाने नाही.. प्रेमाने “अरे बाळा, तुझ्यावर औषधोपचार सुरू आहेत, २-३ किलोमीटर झाले तू पळतोय, तुला धाप लागली आहे… म्हणून मी केव्हाचा तुला बोलावतोय”.आपला नेता इतक्या गर्दीतही आपली इतक्या मायेने काळजी घेतोय हे पाहून माझं मन भरून आलं.
तेव्हा दादांना मी पर्सनल मेसेज केला अन्…
दादा एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये सामील झाले तेव्हा दादांसोबत न जाता पुरोगामी विचारांना साथ देण्याचा मी निश्चय केला. मात्र दादांना पाठ न दाखवता मी शांतपणे त्यांना पर्सनल व्हाट्सअप नंबरवर मेसेज केला.. दादांचं अभिनंदन केलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व माझं तुमच्यावर प्रेम आहे, मात्र मी माझ्या विचारांवर ठाम आहे असं सांगितलं. त्यानंतर अवघ्या १ महिन्यांनी मला आदरणीय अजितदादांचा कॉल आला, दादांचा कॉल पाहिल्यानंतर आता दादा आपल्याला रागवणार असं वाटलं. पण तब्बल १३ मिनिटं दादा माझ्यासोबत अत्यंत प्रेमाने बोलले. “बाळ तू माझ्यासोबत आला नाहीस याचं वाईट वाटलं” असं दादा म्हणाले. त्यावेळी माझं आपल्यावर यापूर्वीही प्रेम होतं, आजही प्रेम आहे, यापुढेही प्रेम असेल, मात्र भाजपाची साथ मी देऊ शकणार नाही.
आपण जेव्हा पुन्हा परतून इकडे याल तेव्हा आपल्या स्वागताला मी सर्वात पुढे असेल असं सांगितलं. त्यानंतर पुढील काळात दादांनी कधीही कुठेही मला दोष दिला नाही. किंबहुना कधीही माझा विषय निघाला तर दादांनी सार्वजनिकरित्या मला शुभेच्छाच दिल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर “प्रशांत जगताप आमचा महापौर होता” असं म्हणत दादांनी माझा सन्मानच केला. महानगरपालिका निवडणुकीत दादांनी माझ्या विरोधात त्यांच्या पक्षाचा उमेदवारही दिला नाही. अजितदादांच्या मनाचा हा मोठेपणा या काळात सर्वांनीच पाहिला. अगदी राजासारखं मन असणारा राजा माणूस महाराष्ट्राने गमावला, अशा महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना आज पुन्हा एकदा जिथे त्यांना अखेरचा निरोप दिला तिथे येऊन वंदन केले !
