पुणे : मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही देखील सर्वधर्म समभावाची आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही महापुरुषांबद्दल आमची आदराची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील, देशातील कोणत्याही महापुरुषांचा अपमान होईल, असे कृत्य होणार नाही, असे सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची भूमिका देखील जाहीर केली.
अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना ४० आमदार सोडून गेले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. उद्या यावर जो काही निकाल यायचा तो येईल. मी आता राज्यभर फिरत असतो. मोठे नेते हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आहेत. परंतु, मला जे दिसत आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पासून मूळ शिवसैनिक कुठेही हललेला नाही. तो आजही ठाकरे यांच्या सोबतच आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जरी शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जरी दिले असले तरी मात्र मूळ शिवसैनिक हा आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे.
राज्यातील नागरिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूतीची भावना आहे. त्यामुळे त्यांच्या मागे सर्वसामान्य माणूस खंबीरपणे उभा असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील एक पक्ष असल्याने आमचा देखील त्यांना पाठिंबा असणार आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत जो वाद सध्या सुरू आहे. त्याबाबत प्रत्येक पक्षाने आपली भूमिका ठरवावी. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सर्व जाती-धर्मातील महापुरुषांना मानत आहोत. त्यामुळे कोणत्याही महापुरुषांचा अपमान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
(230) Eknath Shinde | राहुल गांधी यांची लायकी आहे? | LetsUpp Marathi – YouTube