100th Marathi Sahitya Sammelan: पुणे: ’माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेंहि पैजां जिंके’ या ओवीचा प्रत्यय देणारे 69 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणींना उजाळा देणारे आणि 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी ठरणारे ’साहित्यनिष्ठांची मांदियाळी’ गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता आळंदी देवाची येथील फ्रूटवाले धर्मशाळेत होईल. यामध्ये ग्रंथदिंडी व ग्रंथपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या महासचिव प्रा. स्वाती चाटे व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मसापचे जिल्हा प्रमुख राजन लाखे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये व समन्वयक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, महाराष्ट्र साहित्य परिषद व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे सन्माननीय पाहुणे असतील. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार असतील. संमेलनाला एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा शुभाशीर्वाद लाभेल. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि. कराड व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे.
सोहळ्याप्रसंगी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. मसापचे अध्यक्ष योगेश सोमण हे ग्रंथपूजन करतील. यावेळी आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे व मसापचे कार्यवाह सुनील महाजन विशेष सन्माननीय पाहुणे असतील. दुपारी 12 ते 1.15 वा.पर्यंत श्रीनाथ संस्थानचे पीठाधिपती ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजनाचे सादरीकरण होईल.
दुपारी 2 ते 3.15 या वेळेत ’तीर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थ क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी आजच्या पिढीतील संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे योगदान’ या विषयावर विचारमंथन होणार आहे. या सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये असतील. यावेळी ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, रिंगणचे संपादक सचिन परब व ह.भ.प. बापूसाहेब मोरे हे सन्माननीय वक्ते असतील.
दुपारी 3.30 ते 4.45 या वेळेत प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि डॉ समीरा गुजर यांच्या ’ज्ञानदेवे रचिला पाया’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी सायं पाच वाजता समारोप सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक राजेश पांडे व खेड विधानसभेचे आमदार बाबाजी काळे हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रमुख प्रा. राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ व डॉ. पुरुषोत्तम काळे उपस्थित राहतील.
