Download App

Chinchwad Bypoll उद्धव ठाकरे, अजित पवारांचे ऐकले नाही… राहुल कलाटे रिंगणातच!

  • Written By: Last Updated:

विष्णू सानप

पिंपरी : कसबा आणि चिंचवडमध्ये (Kasba Peth & Chinchwad Bypoll) येत्या २६ तारखेला पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. शुक्रवारी (दि. १०) अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. चिंचवड आणि कसब्यातून कुठल्या पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये चिंचवडमधून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) विरोधात बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते अर्ज ते मागे घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रासचे अजित पवार यांचे राहुल कलाटे यांना ऐकले नाही ते रिंगणातच असल्याने आता ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही. त्याची प्रमुख कारणे आपण पाहणार आहोत.

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी कलाटे यांची मनधरणी करण्याचा आज सकाळीच प्रयत्न केला होता. मात्र, त्याला फारसं यश आले नाही. याचं कारणही महत्वपूर्ण आहे. कारण कलाटे यांनी आपलं राजकीय भवितव्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचे बोललं जात आहे.

या निवडणुकीमध्ये कलाटेंनी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालेले राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठिंबा दिला आणि चिंचवड पोटनिवडणुकीत जर परिवर्तन झालंच अन काटे निवडून आले तर पुढील निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. नेमकी हीच भीती कलाटेंना आहे. त्यामुळे कलाटेंनी आपली या मतदारसंघातील ताकद आणि पकड दाखवण्यासाठीच अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याचे राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात २०१९ ला राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून सर्व पक्षांचा पाठिंबा मिळून कलाटे यांनी सुमारे एक लाख १३ हजार मते मिळवली होती. तेव्हापासून कलाटेंच या मतदारसंघातील वजन चांगलंच वाढल आहे. त्यामुळे ते आपलं वजन काटेंसाठी वापरतील, असं वाटत नाही.

दुसरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद शहरात क्षीण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोठी ताकद म्हणून कलाटेंकडे बघितले जात. शिवसेनेच शहरातील अस्तित्व आणि कलाटेंनी व्यक्तिगत ताकद कमी होणे शिवसेनेला परवडणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून देखील कलाटेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फारसा आग्रह केला गेला नसावा, असंही बोललं जात आहे.

दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चिंचवडमधून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होतं. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यास नाराजी व्यक्त केल्याने अजित पवारांनी ही जागा राष्ट्रवादीकडे खेचत राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे कलाटेंनी अपेक्षेप्रमाणे आपला अपक्ष अर्ज भरत या निवडणुकीत दंड थोपटले आहे. यामुळे चिंचवडमध्ये ही लढत भाजपच्या अश्विनी जगताप महाविकास आघाडीचे नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात रंगणार आहे.

Tags

follow us