मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त 1 लाख वह्यांचे वाटप; सोमेश्वर फाऊंडेशन अन् भाजपचा उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी आमदार स्व. विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त भाजपने 1 लाख मोफत वह्यांच्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला.

Untitle (13)

Untitle (13)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कार्यसम्राट, माजी आमदार स्व. विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 1 लाख मोफत वह्यांच्या वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणाऱ्या या अभियानास विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या उपक्रमाअंतर्गत आज औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल (मनपा ८७-बी) येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका सौ. सपना छाजेड, नगरसेविका सौ. भक्ती गायकवाड, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सनी विनायक निम्हण तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. शंकर मांडवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी इंदिरा गांधी मॉडेल स्कूल (मनपा ८७-बी) यांच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता ठाणगे, गोळवलकर गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संतोष सुतार, सौ. मीनाक्षी करंजुळे, सौ. मेमाणे, सौ. संगीता चिकटगावकर तसेच शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत उत्तम नागरिक बनावे, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि आपल्या ज्ञान, कौशल्य व कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन मान्यवरांनी केले.

शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा भक्कम पाया असून, सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजक नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळांमध्ये १ लाख मोफत वह्यांचे वाटप टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

“शिक्षण ही अशी एक देणगी आहे, जी जितकी वाटली जाते तितकी अधिक समृद्ध होत जाते. ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे हीच खरी समाजसेवा असून, सुशिक्षित पिढी घडविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांना भविष्यातही सातत्याने प्राधान्य दिले जाईल,” असे आयोजक नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी नमूद केले.

Exit mobile version