Pune Loksabha : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तसे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
आज काँग्रेसकडून राज्यभरात पत्रकार परिषद घेतल्या जाणार आहेत. राहुल गांधी यांचं लोकसभेतील निलंबन आणि त्यांना घर खाली करण्याची दिलेली नोटीस या पार्श्वभूमीवर काँग्रेस आज राज्यभरात पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवणार आहे. त्याच अनुषंगाने आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही.”
संजय राऊत म्हणत होते ते हेच दंगे का ? ; सोमय्यांकडून राऊत टार्गेट
ते पुढे म्हणाले की पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. पण त्यामुळे भाजपच्या गोटात भीती निर्माण झाली आहे.
काही दिवसापूर्वी पुण्यात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत नाराज उमेदवारांना शांत करून महाविकास आघाडीकडून एकमताने निवडणूक लढली. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा कसबा पॅटर्न दिसणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
बापटांच्या जागी कोण? सूनबाईंपासून मोहोळ, मुळीक यांसह अनेक नावे चर्चेत
गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय संबंध होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र, असे असतानाही पक्षातील इतर नेत्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. यात आघाडीवर माजी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांची नावे आहेत. त्यामुळे वरील नावांचा विचार होणार की, बापट यांच्याच घरात तिकीट दिलं जाणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.