Download App

तळवडे दुर्घटनेत कारवाईचा फास आवळला; रेड झोनबाबतही बैठक घेणार : फडणवीसांची ग्वाही

पुणे : पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कँडल) मेणबत्ती कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या 11 झाली आहे. तर पाच जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणातील सर्व दोषींविरोधात कारवाईचा फास आवळला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच रेड झोनच्या हद्दीबाबतही बैठक घेण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

आज (15 डिसेंबर) विधानपरिषेदत आमदार उमा खापरे यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि शासनाने काय कारवाई केली हे जाणून घेण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. यावेळी आमदार सचिन आहिर आणि आमदार भाई जगताप यांनीही चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सदर कंपनीचा भाग रेड झोनमध्ये येत असल्याच्या मुद्द्याकडेही खापरे यांनी लक्ष वेधले. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही त्यांचे मत व्यक्त केले. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis has assured that action will be taken against all the culprits in Talwade tragedy)

या सगळ्या चर्चेवर बोलताना फडणवीस म्हणाले, संबधित व्यवसाय विनापरवाना सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई जाईल. परवान्याशिवाय टायटेनियम पुरवठा करता येत नाही, येथे तोही झाला आहे, त्यामुळे पुरवठादारावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सुद्धा कारवाई करण्यात येईल.

सदर्न कमांडच्या बऱ्याच आस्थापना येथे असल्याने हा भाग रेड झोनमध्ये येतो. कालांतराने रेड झोनमध्ये वाढ झाली. त्याबाबत काही प्रश्न आहेत, त्यावर लवकरच बैठक घेण्यात येईल. या परिसरातील सर्व उद्योगांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. धोकादायक उद्योगांवर निर्बंध आणण्यात येतील. या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा सुद्धा लावण्यात येईल, अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली.

काय घडली होती घटना?

पिंपरी चिंचवडच्या तळवडे येथे 8 डिसेंबर रोजी केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कँडल) मेणबत्ती कंपनीत भीषण स्फोट झाला. सुरुवातीला या घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर तब्बल 10 जण जखमी झाले होते. यातील जखमींवर पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, आणखी पाच जणांची प्राणज्योत मालवली.

Tags

follow us