Dr. Abhay Firodia : फोर्स मोटर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि अभय प्रभावना संग्रहालय व ज्ञानकेंद्राचे संस्थापक डॉ. अभय एन. फिरोदिया ( (Dr. Abhay N. Firodia) यांचा जागतिकस्तरावर गौरव करण्यात आला आहे. त्यांना लंडनमधील वेस्टमिन्स्टर येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ जैनॉलॉजी (IOJ) तर्फे देण्यात येणारा ‘IOJ अहिंसा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अहिंसा, करुणा आणि शांततापूर्ण सहअस्तित्व या मूल्यांच्या प्रसारासाठी दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
डॉ. फिरोदिया हे भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि समाजसेवक आहेत. त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीसोबतच भारतीय तत्त्वज्ञानातील शाश्वत मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचाही या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला आहे. वॉटफोर्डचे खासदार आणि जैन ऑल-पार्टी पार्लमेंटरी ग्रुपचे अध्यक्ष मॅट टर्मेन, तसेच व्हॅटिकनमधील आंतरधर्मीय संवादविषयक विभागाचे प्रमुख कार्डिनल जॉर्ज जेकब कूवाकाड यांच्या हस्ते डॉ. फिरोदिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला खासदार बॉब ब्लॅकमॅन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जैनॉलॉजीचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. मेहूल संघराजका, बॅरोनेस शमा टॅटलर, लॉर्ड कृष्ण रावल, हार्टफुलनेस चळवळीचे जागतिक मार्गदर्शक दाजी (कमलेश पटेल), आर्चबिशप बर्नार्ड लॉन्गली, बिशप पॉल हेंड्रिक्स, बिशप पॅट्रिक मॅकिनी, साध्वी श्री शिलापिजी महाराज आणि शांतिलाल मुथा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नेल्सन मंडेला, दलाई लामा यांच्यासारख्या दिग्गजांचा यापूर्वी गौरव
इन्स्टिट्यूट ऑफ जैनॉलॉजी (IOJ) या संस्थेतर्फे दिला जाणार अहिंसा पुरस्कार हा अहिंसा, करुणा आणि सर्व सजीवांप्रती आदर या मूल्यांच्या प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, परमपूज्य दलाई लामा आणि ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तिसरे यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
फोर्स मोटर्सच्या यशात डॉ. फिरोदिया यांचे महत्त्वपूर्ण योगदान
डॉ. फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली फोर्स मोटर्सने वाहननिर्मिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. कंपनी व्यावसायिक वाहने, प्रवासी व्हॅन्स, विशेष उपयोगासाठी तयार करण्यात येणारी वाहने आणि प्रगत ऑटोमोटिव्ह इंजिन्सची निर्मिती करते. आज फोर्स मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्हॅन उत्पादक कंपनी आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीतील शालेय बस आणि रुग्णवाहिकांच्या बाजारपेठेत कंपनीचा सुमारे 75 टक्के वाटा असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील यशाबरोबरच डॉ. फिरोदिया यांनी भारताच्या तत्त्वज्ञानपरंपरेचे महत्त्व आणि आधुनिक समाजाला दिशा देण्याची तिची क्षमता यावर सातत्याने भर दिला आहे. जैन तत्त्वज्ञानातील शाश्वत मूल्ये व्यापक समाजापर्यंत पोहोचवणे, तसेच ही मूल्ये केवळ आध्यात्मिक तत्त्वे नसून नैतिक, करुणामय आणि सुसंवादी जीवनाचा व्यावहारिक आधार आहेत, हे पटवून देण्यावर त्यांचा भर राहिला आहे. आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी असलेल्या तत्त्वज्ञानाविषयी बोलताना डॉ. फिरोदिया म्हणाले, “जैन मूल्यांच्या संपूर्ण सखोल आणि व्यापक तत्त्वज्ञानाचा सार एका शब्दात सांगायचा झाल्यास तो म्हणजे ‘अहिंसा’.”
अभय प्रभावना संग्रहालयातून जैन तत्त्वज्ञानाचा वारसा जपण्याचा प्रयत्न
डॉ. फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली पुण्याजवळ स्थापन करण्यात आलेल्या अभय प्रभावना संग्रहालय आणि ज्ञानकेंद्राच्या पायाभूत विचारांमध्येही याच मूल्यांचा समावेश आहे. विद्वान, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील विचारवंतांच्या सहकार्याने दशकभराच्या कालावधीत हे संग्रहालय विकसित करण्यात आले आहे. जैन धर्माचा समृद्ध तात्त्विक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा तसेच भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत त्याने बजावलेली भूमिका लोकांसमोर आणणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
अभय प्रभावना संग्रहालय आणि ज्ञानकेंद्राविषयी
पुण्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले अभय प्रभावना संग्रहालय आणि ज्ञानकेंद्र ही जैन धर्माची तत्त्वे, संस्कृती, इतिहास आणि भारतीय संस्कृतीवरील त्यांचा प्रभाव यांचे दर्शन घडवणारी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. अमर प्रेरणा ट्रस्टच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चर अँड हिस्ट्री या संस्थेने या संग्रहालयाची निर्मिती केली आहे. येथे अनुभवाधारित प्रदर्शने, आधुनिक तंत्रज्ञान, कला, वास्तुकला आणि सुबक नियोजनाने विकसित केलेल्या खुल्या जागांचा समन्वय साधण्यात आला आहे. भारतातील समृद्ध तत्त्वज्ञानपरंपरा नव्या पिढीसह सर्व वयोगटांतील लोकांना सहज समजावी आणि तिचे महत्त्व अनुभवता यावे, या उद्देशाने हे ज्ञानकेंद्र उभारण्यात आले आहे.
