Special Work Human Rights Award : शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन व दिशा देणारे आणि युवकांना कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे फ्यूल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे (Ketan Deshpande) यांना मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचा ‘ विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने’ (Special Work Human Rights Award) सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, निवृत्त प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही जटाळे, निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्रीशकुमार, अॅड. शार्दूल जाधवर आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे जागर मानवी हक्काचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविणारे डॉ. देशपांडे यांनी फ्युएलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन, कौशल्य विकास, स्कॉलरशीपच्या माध्यमातून भविष्यासाठी नवी दिशा निर्माण केली आहे. डॉ. देशपांडे यांच्या नेतृत्वात फ्युएल बिझनेस स्कूल ने आधुनिक शिक्षण, उद्योगाभिमूख अभ्यासक्रम आणि कौशल्य प्रशिक्षण यांची प्रभावी सांगड घालून विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संधीच्या समान हक्कांना बळकटी दिली.
सीएसआर उपक्रम, ग्रामीण विद्याार्थ्यांना विशेष मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण या माध्यमातून फ्युएल शिक्षण संस्थेने खर्या अर्थाने युवकांसाठी मानवतावादी शिक्षण चळवळ उभी केली आहे. युवकांना सक्षम, कौशल्य संपन्न आणि स्वाभिमानी बनविण्यासाठी डॉ. देशपांडे यांनी अतुलनीय कार्य केले आहे. समाजाला दिशा देणाऱ्या त्यांच्या या कार्याचा हा गौरव आहे.
