‘अक्करमाशी’कारांच्या शिरपेचात मानाचा तुरा! शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे

Dr. Sharankumar Limbale १०० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड.....

Dr. Sharankumar Limbale

Dr. Sharankumar Limbale

Dr. Sharankumar Limbale : पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कवी, कादंबरीकार आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी दलित साहित्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या लिंबाळे यांच्या निवडीमुळे साहित्यविश्वात त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक योगदानाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ‘अक्करमाशी’ या गाजलेल्या आत्मचरित्रामुळे घराघरांत पोहोचलेले लिंबाळे आता शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिकांच्या मेळाव्याचे नेतृत्व करणार आहेत.

या अध्यक्षपदासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासह रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड यांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या निवडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अंतर्गत मतभेद आणि आर्थिक व्यवहारांवरून निर्माण झालेला वादही चर्चेत होता. शासकीय निधीच्या हिशेबावरून परिषदेतील २१ सदस्यांनी अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. या पदाधिकाऱ्यांना कामकाजाचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार उरला नसल्याचा दावा संबंधित सदस्यांनी केला होता. त्यामुळे या गटाने महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम सप्रे यांना पत्र पाठवून अध्यक्षपदासाठी लिंबाळे यांच्यासह अन्य नावांचा विचार करण्याची मागणी केली होती.

कोण आहेत डॉ. शरणकुमार लिंबाळे?

डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील महत्त्वाचे आंबेडकरवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. आत्मकथन, कादंबरी, कविता, कथा आणि साहित्यसमीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी ठसा उमटवला आहे. जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, वंचितांचे जगणे आणि मानवी प्रतिष्ठेचा संघर्ष हे त्यांच्या लेखनाचे केंद्र राहिले आहे. त्यांच्या साहित्याचा आवाका केवळ मराठीपुरता मर्यादित नसून अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत.

‘अक्करमाशी’ने बदलले मराठी साहित्यविश्व

लिंबाळे यांच्या साहित्यिक प्रवासातील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र. १९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्यांनी जातीय विषमता, गरिबी, सामाजिक अवहेलना आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी करावा लागलेला संघर्ष अत्यंत निर्भीडपणे मांडला. या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी चर्चा घडवून आणली. पुढे या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘The Outcaste’ या नावाने प्रकाशित झाला आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाचक मिळाले.

संघर्षमय बालपण ते साहित्यविश्वातील मानाचे स्थान

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म १ जून १९५६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे झाला. बालपणापासूनच त्यांनी जातीय भेदभाव, गरिबी आणि सामाजिक विषमतेचे अनुभव घेतले. या अनुभवांनी त्यांच्या लेखनाला वास्तवाची धार दिली.

त्यांनी शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक लिटरेचर : एक तौलनिक अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळवली. ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकातून त्यांच्या लेखनप्रवासाला सुरुवात झाली.

‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’मधून मांडली स्वतंत्र भूमिका

लिंबाळे यांचे योगदान केवळ साहित्यनिर्मितीपुरते मर्यादित नाही. दलित साहित्याची स्वतंत्र वैचारिक आणि समीक्षात्मक भूमिका मांडण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथातून त्यांनी दलित साहित्याच्या स्वरूपाविषयी आणि त्याच्या मूल्यांकनाच्या निकषांविषयी सखोल मांडणी केली. या ग्रंथाचा इंग्रजी अनुवादही प्रकाशित झाला असून, दलित साहित्याच्या अभ्यासासाठी तो महत्त्वाचा संदर्भ मानला जातो.

‘सनातन’ला सरस्वती सन्मान; राष्ट्रीय स्तरावर मोठी दखल

२०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सनातन’ या कादंबरीसाठी लिंबाळे यांना २०२० चा प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले दलित साहित्यिक ठरले. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ‘सनातन’च्या इंग्रजी अनुवादाने २०२४ मध्ये जेसीबी साहित्य पुरस्काराच्या अंतिम यादीतही स्थान मिळवले.

४० हून अधिक पुस्तके; विविध साहित्यप्रकारांत ठसा

डॉ. लिंबाळे यांनी आत्मकथन, कादंबरी, कथासंग्रह, समीक्षा आणि वैचारिक लेखन अशा विविध प्रकारांत विपुल लेखन केले आहे. ‘अक्करमाशी’, ‘पुन्हा अक्करमाशी’, ‘बारामाशी’, ‘राणीमाशी’ ही त्यांची आत्मकथनपर पुस्तके विशेष चर्चेत आहेत. ‘सनातन’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘दंगल’, ‘उपल्या’ आणि ‘रामराज्य’ या त्यांच्या कादंबऱ्यांचाही उल्लेख महत्त्वाचा आहे. ‘हरिजन’, ‘रथयात्रा’ आणि ‘उद्रेक’ हे त्यांचे कथासंग्रह, तर ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’, ‘दलित पँथर’, ‘दलित ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण्य’ हे वैचारिक व समीक्षात्मक लेखन त्यांच्या साहित्यिक योगदानाची व्याप्ती स्पष्ट करतात.

शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शंभरावे वर्ष हा मराठी साहित्यविश्वासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. अशा ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड होणे ही त्यांच्या साहित्यिक प्रवासाची मोठी दखल मानली जात आहे. आंबेडकरवादी विचार, सामाजिक वास्तवाचे निर्भीड चित्रण आणि दलित साहित्याची वैचारिक मांडणी यांमुळे त्यांनी मराठी साहित्याला वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून मराठी साहित्याची वाटचाल, सामाजिक वास्तव, साहित्यिकांची जबाबदारी आणि बदलत्या काळातील साहित्याची भूमिका यांवर कोणती मांडणी होते, याकडे आता साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version