Family troubled by DJ’s loud music in Moshi : पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरातून ध्वनीप्रदूषणासंदर्भात गंभीर प्रकार समोर आला आहे. सण-उत्सवांच्या काळात सोसायटीमध्ये लावण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजातील डीजे आणि साऊंड सिस्टीममुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मोशीतील मंत्रा मुव्हमेंट सोसायटीमध्ये राहणाऱ्या वर्षा गणेश कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. घरात फिट्सचा त्रास असलेला मुलगा आणि स्वतः वर्षा कदम यांना आरोग्याच्या समस्या असतानाही वारंवार विनंती करून साऊंडचा आवाज कमी केला जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वर्षा कदम यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा पाच वर्षांचा असल्यापासून त्याला फिट्सचा त्रास आहे. वर्षा कदम यांनाही फिट्सचा त्रास आहे. त्यांच्या घराखालीच सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजात डीजे आणि साऊंड सिस्टीम लावली जाते. आवाज इतका मोठा असतो की घरातील दारे, खिडक्या आणि भांडीही हादरतात. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात अनेकदा त्यांना घर सोडून नातेवाईकांकडे किंवा सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील रिफ्युजी एरियामध्ये जाऊन राहावे लागते. मुलाच्या परीक्षेच्या काळातही या आवाजामुळे त्याला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी वर्षा कदम यांचे वडील गंभीर आजारी होते. डॉक्टरांनी त्यांना घरच्या वातावरणात ठेवण्याचा सल्ला दिला होता. वडील ऑक्सिजनवर असल्याने कदम यांनी सोसायटीतील कार्यक्रम आयोजकांना साऊंडचा आवाज कमी करण्याची किंवा सिस्टीम दुसरीकडे हलवण्याची विनंती केली. मात्र, विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे वडिलांना शांत वातावरण मिळावे म्हणून त्यांना बारामतीजवळील मूळ गावी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीत मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता
मात्र, गावाकडील रस्ता आणि पूल धोकादायक असल्याने रुग्णवाहिका तसेच आवश्यक वैद्यकीय मदत वेळेत मिळू शकली नाही, असा कदम यांचा दावा आहे. त्यानंतर वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी वर्षा कदम यांच्या हातात शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, वडिलांच्या मृत्यूनंतरही सोसायटीतील कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवल्यानंतर तुम्ही धर्माच्या विरोधात आहात, असे सांगितले जात असल्याचा आरोपही कदम यांनी केला. आपण सर्व सण-उत्सव साजरे करतो, मात्र धर्माच्या नावाखाली दुसऱ्याच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास फक्त तुम्हालाच होतो, साऊंडप्रूफ काचा बसवून घ्या, असे सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.
चिंचवडमध्ये महापारेषणच्या वीज उपकेंद्रात मोठा स्फोट; शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा बंद
या प्रकरणात वर्षा कदम यांनी 2023 मध्ये पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलीस येण्यापूर्वी साऊंड बंद केला जातो आणि पोलीस गेल्यानंतर पुन्हा सुरू केला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.
वर्षानुवर्षे तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने कदम कुटुंबाने आता पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सण-उत्सवांना विरोध नसला तरी आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीमवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
