Global Scholars Honored in Pune : पुण्यात एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स फेलिसिटेशन सेरेमनी’ उत्साहात पार पडला. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील तसेच कुटुंबातून उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या एकलव्य इंडिया फाऊंडेशनने या कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला.
पुण्यातील एस. बी. रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक येथील बहुउद्देशीय सभागृहात 9 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे 25 ग्लोबल स्कॉलर्स आणि त्यांचे पालक उपस्थित होते. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधींचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन, मुंबईचे हेड ऑफ पॉलिटिकल अँड बायलॅटरल अफेयर्स जॉन निकेल, प्राप्तिकर-सवलती विभाग पुण्याचे आयुक्त आणि आयआरएस अधिकारी नितीन वाघमोडे तसेच सिम्बायोसिस इंटरनॅशनलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअरच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. हेमांगी कडलग यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरकारने आडमुठेपणा करू नये, 12 तारखेला मुंबईत आंदोलन, जरांगे पाटलांची मोठी घोषणा
विशेष म्हणजे गत शैक्षणिक वर्षात एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतलेल्या विविध राज्यांतील सुमारे 30 विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्र सरकारसह विविध आंतरराष्ट्रीय तसेच सामाजिक संस्थांकडून मिळून 15 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत. अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबातून उच्च शिक्षणासाठी प्रथमच परदेशात जात असून, नामांकित जागतिक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासातील संघर्ष, अडचणी आणि मिळालेल्या संधींबाबत पालकांनी अनुभव व्यक्त केले. सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करत आपल्या मुलांनी जागतिक विद्यापीठांपर्यंत मजल मारल्याने अनेक पालकांसाठी हा क्षण भावनिक ठरला.
एकलव्य इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे यांनी संस्थेच्या गेल्या दहा वर्षांच्या कामाचा आढावा मांडला. त्यांच्या माहितीनुसार, एकलव्यच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले आहे. तर 110 हून अधिक विद्यार्थ्यांनी 12 देशांतील जागतिक विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी मिळवली असून, त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्णही केले आहे.
’10 दिवस दारू नाही तर, रुग्णालयं भरतील’; पुण्याच्या दारूबंदीवर HC ची मिश्किल टिप्पणी
गेल्या दशकभरापासून एकलव्य इंडिया फाऊंडेशन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित तसेच पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन, प्रवेश प्रक्रियेतील मदत आणि शैक्षणिक सल्ला देत आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थीही जगातील नामांकित विद्यापीठांपर्यंत पोहोचू शकतात, हे या विद्यार्थ्यांच्या यशातून अधोरेखित होत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
दशकपूर्तीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात संस्थेच्या दहा वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच भविष्यात आणखी विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची दिशाही मांडण्यात आली.
