पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना दररोज नवनवीन माहिती हाती लागत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास मारणे (Ramdas Marane) उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह 17 जणांना अटक केली आहे. तपासातील प्राथमिक माहितीनुसार, मुख्य हल्लेखोर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहोळची हत्या केली. मात्र आता या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनांनी अतिरेकी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Hindutva organizations have suspected a terrorist attack behind the killing of notorious gangster Sharad Mohol.)
हिंदुत्ववादी नेते मिलींद एकबोटे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे. पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला, त्याचे सीसीटीव्ही सापडत नाही, याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही, पिस्तूल सापडले त्याचाही तपास नाही. यामागे राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे.
शरद मोहोळ याने मागील काही काळापासून गो रक्षण चळवळ मोहीम वाढविली होती. दहशतवादी कातील सिद्दीकीची येरवडा कारागृहात हत्या केली होती. त्यामुळे या हत्येमध्ये अतिरेकी संघटनांनी काही कट कारस्थान केले आहे का अशी शंका आहे. शरद मोहोळ हत्येमागील कट कारस्थान उघडकीस आले पाहिजे, यासाठी हा तपास राष्ट्रीय तपासण यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाजाची मागणी आहे, असेही एकबोटे म्हणाले.
दरम्यान, मोहोळ हत्याकांडाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, कट कारस्थान समोर यावे, मुख्य सुत्रधार पकडला जावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना 28 जानेवारी 2024 ला पुण्यात एक जन मोर्चा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूड इथपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पाच जानेवारी रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुरुवातीच्या काही तासातच मुख्य हल्लेखोरासह आठ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. त्यांना शस्त्रे आणि पैसे कोणी पुरवले, याचाही पोलिस तपास करत आहेत. याचा तपास करत असताना पनवेल पोलिसांच्या पथकाने पनवेल आणि वाशी येथील मोहोळच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणे याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. यात तीन मुख्य आरोपी आणि इतर संशयित आहेत.