पुणे : अन्न व औषध प्रशासन आयुक्त (FDA) तुकाराम मुंढे (Tukaram Munde) हे सध्या धडकेबाज कारवाई करत आहेत. त्यांच्या कारवाईची छाप आता विद्यार्थ्यांवर दिसून येत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एका शाळेतील विद्यार्थी एफडीएच्या अधिकारी यांचा वेशात आला होता.
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित श्रीमती एस. आर. केदारी बालकमंदिर (बारुळवाडी, नारायणगाव) येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या लहान गटासाठी नुकतीच ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत चिमुकल्या अभिराज याने साकारलेली ‘अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकारी’ ही वेशभूषा व सादरीकरण सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले.
हातात एफडीएचे फलक घेऊन आलेल्या अभिराजने अन्न भेसळीवर प्रकाश टाकत समाजोपयोगी संदेश दिला. “अन्न व औषधांची तपासणी करून खराब अन्न देणाऱ्यांवर कडक कारवाई करणे हे माझे कर्तव्य आहे. अन्न शुद्ध, औषध शुद्ध, तरच आरोग्य राहील छान! तुकाराम मुंढे सरांसारखे मीही चांगले काम करेन,” असा दृढ निश्चय त्याने आपल्या बोबड्या बोलांतून व्यक्त केला. त्याच्या या समयोचित, प्रबोधनात्मक व प्रभावी सादरीकरणाचे व्यासपीठावरील मान्यवर, शिक्षक आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विशेष कौतुक केले.
