जुन्नर : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) हे राखीमॅन (Rakhiman) बनल्याचे पाहायला मिळालं आहे. रक्षाबंधन (Rakshabandhan) निमित्ताने आज (ता.30 ऑगस्ट) आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांना जुन्नर तालुक्यातील सुमारे 8 हजार महिला भगिनींनी राखी बांधली आहे. यावेळी आमदार बेनके यांनी हा भाऊ प्रत्येक सुख दु:खात तुमच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही दिली.
गेल्या अनेक वर्षापासून बेनके कुंटुंबाची रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्याची पंरपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधन सोहळ्याला उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राखी बांधण्यासाठी आलेल्या महिलांच्या गर्दीने नारायणगाव येथील आमदार बेनकेंच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार बेनके यांनी रक्षाबंधनाची सांस्कृतिक परंपरा कायम राखत एक चांगला सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील महिला भगिनींचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्याचे हे उत्तम व्यासपीठ बेनके यांनी उपलब्ध करून दिले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमामुळे आमदार बेनके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राखी बांधण्यासाठी बेनके यांनी आपले दोन्ही हात अतिशय नम्रपणे पुढं केले होते. सध्या दोन्ही हात राखींनी भरलेले असलेले त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. राखी बांधण्यासाठी आलेल्या महिला भगिनींसोबत सेल्फी घेत त्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.
Wadhawan बंधूंवर मेहेरबान झालेल्या पोलिसांना दणका : एका अधिकाऱ्यासह 7 जणांवर मोठी कारवाई
यावेळी अतुल बेनके म्हणाले, रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र आणि हक्काच्या नात्यातील प्रेम, विश्वास, ऋणानुबंध वाढवणारा सण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जुन्नर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अनेक भगिनींनी प्रेमाने आणि आपुलकीने राखी बांधल्या. अतिशय उत्साहात आणि आनंदाने आम्ही रक्षाबंधन हा सण साजरा केला. खरं तर या दिवसाची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. बेनके कुटुंब आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणींना भेटून आनंद साजरा करण्याचा हा दिवस. दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या या सर्व भगिनींनी यावर्षीचा रक्षाबंधन सोहळा आणखी अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांची भावना मला शब्दांत व्यक्त करता येत नाहीत.
तुम्हां सर्वांच्या प्रेमाची आणि विश्वासाची कायम जाण ठेवून, उत्साहाने, जबाबदारीने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मला मिळाली. हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील याची खात्री देतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, अशा भावना यावेळी बेनके यांनी यावेळी व्यक्त केल्या.