पुणे : पोटनिवडणुकीच्या प्रचाराला अवघा २४ तासांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे गुरुवारी कसबा पेठ मतदार संघात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये प्रचारासाठी प्रचंड चुरस पहायला मिळाली. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही ‘रोड शो’च्या निमित्ताने आमनेसामने आल्याने या ‘रोड शो’मुळे निम्मे पुणे शहर ठप्प झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
हायप्रोफाइल नेत्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दुर्लक्ष झाल्याने नागरिक पोलिसांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कसबा निवडणूक प्रचार रॅलीमुळे पेठामधील तसेच डेक्कन परिसर, बाबा भिडे पुल ते नदीपात्र रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. साधारण तासभर या वाहतूककोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता लागत आहे. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात सध्या दोन्ही बाजुने प्रचाराचा धुरळा उडाला आहे. कोपरा सभा, वैयक्तिक गाठीभेटी, रॅली, रोड शो आणि मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले होते.
मुख्यत: शहरातील लक्ष्मी रोड, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसरातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. तसेच नारायण पेठेतील केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्त्यामार्गे सिंहगड रोड ते टिळक रोडमार्गे स्वारगेट-हडपसर रोड, स्वारगेट-सातारा रोडही जवळपास तासांपेक्षा अधिक काळ वाहतूककोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला.
पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी अत्यंत कळीचा मुद्दा बनत चालला आहे. मात्र, पोटनिवडणुकीमुळे त्यात आणखीनच भर पडत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचलक देखील हैराण झाले आहेत.
रवींद्र धंगेकर यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज दिवसभर आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. तर हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात आहेत.