Download App

पुण्यात नाही चालले खोके, भाजपच्या तंत्राला पुणेकरांचे उत्तर; जितेंद्र आव्हडांचे खास स्टाइलने आभार

पुणे : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या पोटनिवडणूकीचे निकाल काल लागले. ही निवडणूक चुरशीची होणार हे सुरुवातीपासूनच अपेक्षित होतं. पण, मी जे म्हणत होतो. त्यावर मी आजही ठाम आहे की, महाराष्ट्राचे पुढचे राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे ठरवणारी ही निवडणूक असेल. सत्ताबदल करताना वापरलेले तंत्र हे तसे देशाच्या लोकशाहीत आणि महाराष्ट्रात नवीन होते इतक्या उघडपणाने भाव लावून आमदार विकत घेणे हे महाराष्ट्र नी कधी अनुभवले नव्हते.

लोकांच्या मनात चीड आणणारे होते. कोण एकत्र आले, कोण एकत्र आले कोण नाही हे बाजूला ठेवा. पण यानिमित्ताने जनता एकत्र आली आणि सत्य उघड केले. मतदाराला कुणीही विकत घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करत पुण्यात नाही चालले खोके, कालपासून गायब आहेत बोके, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकांचे विश्लेषण केले आहे.

हे वाचा : घोषणा देणं चुकीचं असेल तर आम्ही.., जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांनाही सोडलं नाही

ते पुढे म्हणाले,की 1977 सालातील इतिहास तपासून बघा. सत्ता लोकांची गळचेपी करीत आहे असे जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा जनता शांत बसली. फरक एवढाच होता की, तेव्हा वृत्तपत्रे हे स्वतंत्र मनाने लिहीत होती, व्यक्त होत होती. जी संस्था इंदिरा गांधींनी निर्माण केल्या होत्या त्यामधील एक महत्वाची संस्था होती IB (Intelligence Bureau) त्या IB ने इंदिरा गांधी यांना सांगितले की, वातावरण चांगले आहे निवडणूका घ्या तुमचा विजय निश्चित आहे.

इंदिरा गांधींच्या पक्षाचा नाही तर इंदिरा गांधींचाही पराभव झाला, त्यांचा मुलगा संजय गांधींचाही पराभव झाला. इंदिरा गांधींसोबत असलेले मातब्बर नेते त्या निवडणुकीत हरले. याचा अर्थ लोक बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहीत धरु नये. लोक स्वतंत्र विचार करतात. कदाचित व्यक्त होत नसतील. पण, व्यक्त होण्यासाठी संधी पाहत असतात, असे ते म्हणाले.

मी जितेंद्र आव्हाडांना ठोकणार, धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट

रोजगार उपलब्ध नाहीत, महागाई वाढत आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली नाही. ह्या सगळ्या बाबी जरी एकत्र केल्या तरी आपल्या मतांची खरेदी विक्री होते हे लोकांना मान्य होत नाही. लोकशाहीची गळचेपी होते आहे हे जनतेला चीड आणणारे असते.

कसब्यात आणि चिंचवडमध्ये (kasba Chinchwad Bypoll) 70 खोके वाटले हे अगदी उघडपणाने लोक चर्चा करत होते. त्याचा परिणाम असा झाला की, लोक हा विचार करायला लागले की आता राजकारणात ही परिस्थिती आली आहे की, करोडो वाटा आणि अख्खा मतदारसंघ विकत घ्या. मतदार संघातील प्रत्येक मतदार हा स्वत:चे मत विकायला तयार नसतो. तुम्ही गरीबांची मते विकत घेऊ शकता हा जो प्रचार झाला. त्यामुळे लोक चिडले आणि सगळे एक झाले.

कसब्यात कुठेही जातीपातीचे राजकारण झाले नाही. किंबहुना ब्राम्हणांना गृहीत धरु नका असा स्पष्ट संदेश कसब्याच्या मतदारांनी दिला. चिंचवडमध्ये जर कलाटे उभे राहिले नसते तर काटेंचा विजय निश्चित होता. सहानुभूतीची लाट असून देखील काही मतांनी काटेंचा पराभव झाला आणि त्याला कारणीभूत कलाटे ठरले.

राहुल कलाटे (Rahul kalate) आणि काटेंची (Nana Kate) मते एकत्रित केली तर ती जगताप (Ashwini Jagtap) यांच्यापेक्षा जास्त आहेत. किंबहुना कलाटे लढले नसते तर काटे हे 20 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले असते, असे आव्हाड म्हणाले.

Sanjay Raut : 2024 साली सांगलीचा कसबा होईल, राऊतांचा भाजपला इशारा

याचा अन्वयार्थ एवढाच आहे की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये राजकारणात सुरू असलेली खरेदी विक्री ही लोकांना अजिबात आवडलेली नाही आणि त्यांनी पुढील दिशा काय असेल हे त्यांनी मतांद्वारे दाखवून दिल्याचे आव्हाड म्हणाले.

खरतरं पुण्याचे आभारच मानायला पाहिजे. कारण पुण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवून दिली आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे दाखवून दिले. पैसा देऊन मतदारांना विकत घेऊ त्याची ही एक किंमत आपण ठरवू हा भ्रम मतदारांनी उधळून लावला, असे आव्हाड यांनी सांगितले.

Tags

follow us