Download App

Kasba Peth Bypoll अभिजित बिचुकलेंची संपत्ती माहिती आहे का, किती आहे ते?

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उडी घेणारे बिग बॉस फेम अभिजित आवाडे-बिचुकले (Abhijeet Aawade-Bichukle) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर वाद आणि बिचुकले हे काही आता नवे राहिले नाही. मात्र, आम्ही आज आपल्याला त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज (Nomination Form) भरताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आपल्या संपत्तीचे विवरण पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याकडे फक्त रोख रक्कम २० हजार रुपये तसेच स्थावर जंगम मालमत्ता केवळ ६३ हजार रुपये इतकेच असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रभर गाडी आणि तामजाम घेऊन फिरणाऱ्या बिचुकले यांच्याकडे एकही गाडी नाही. तसेच आपल्याला निश्चित किती उत्पन्न मिळते याबद्दल देखील काहीही स्पष्ट केले नाही. मात्र, त्यांच्या नावावर चार फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यातील दोन खटले अद्याप प्रलंबित आहेत.

वाद आणि अभिजित बिचुकले हे समीकरण आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहे. साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात खासदारकीची निवडणूक, त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघात आमदारकीची निवडणूक तर आता पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. जशी पोटनिवडणुकीत उडी घेतली तसे आधी पत्रकारांसोबत नंतर काही कार्यकर्त्यांसोबत वाद घातला. त्यानंतर काही कार्यकर्त्यांसोबत फोटो काढण्यावरून प्रकरण पार शिवीगाळी करण्यापर्यंत पोहोचले. असे सतत वादात असणाऱ्या अभिजित बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले असून मीच जिंकून येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेणारे अभिजित बिचुकले तसेच त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या नावावर शेतजमीन नाही. त्यांनी आपण कवी, कलाकार आणि समाजसेवा करत असल्याचे म्हटले आहे. त्यातूनच आपल्याला उदरनिर्वाहासाठी उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले आहे. मात्र, निश्चित उत्पन्न किती मिळते याबद्दल काहीही जाहीर केलेले नाही.

Tags

follow us