पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba Peth & Chinchwad Bypoll) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आखेर (MNS) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार नाही. केवळ या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर (Babu Wagaskar) यांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे आखेर ठरले असून भाजपच्या डब्याला मनसेचे इंजिन लागणार आहे.
भाजपकडून कसबा पेठ मतदार संघात हेमंत रासने तर चिंचवड मतदार संघात अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मनसे भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देणार अशी चर्चा देखील सुरु होती. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष होते. आज आखेर मनसेचे पुणे महापालिकेतील गटनेते बाबू वागस्कर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु, या दोन्ही मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसे उतरणार नाही. केवळ आमच्या पक्षाचा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असेल. हा निर्णय कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांसाठी घेतला आहे, असे बाबू वागस्कर यांनी म्हटले आहे.
भाजपच्या पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी सायंकाळी मनसेच्या पुण्यातील कार्यालयात पदाधिकाऱ्यांची पाठिंब्या संदर्भात भेट घेतली. त्यावेळी मनसेचे अनिल शिदोरे, बाबू वागस्कर व इतर नेते उपस्थित होते.
तसेच या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील या दोन्ही जागा बिनविरोध करा म्हणून महाविकास आघाडीला आवाहन केले होते. त्यासंदर्भात मनसे अधिकृत पत्र देखील जाहीर केले होते.
माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मनसेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. मात्र, ते प्रचारात सध्या येणार नसल्याचे कळवले आहे. दोन दिवसानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे स्वतः पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे उतरेल, याबाबत निर्णय होईल, अशी आम्हाला खात्री आहे.