Letsupp Exclusive : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात तीन मित्रांनीच दिली सुपारी; सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या ताब्यात

Rana Suryavanshi Attack Case Update राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Letsupp Image (5)

Letsupp Image (5)

Rana Suryavanshi Attack Case Update : राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. राणा सूर्यवंशी यांना संपवण्यासाठी ज्यांनी मारेकऱ्यांना सुपारी दिली होती, ते त्यांचेच जवळचे तीन मित्र असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राणा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्यात आणि तेथून पुढेही त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरण्यात हेच मित्र पुढे होते.

दौंडच्या ढाब्यावर ठरला कट

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा यांच्या तीन मित्रांनी स्वप्निल कांबळे आणि निनाद महाडिक यांना दौंड जवळील एका ढाब्यावर भेटून २ लाख रुपयांची सुपारी दिली होती. विशेष म्हणजे, ज्या ‘डिफेंडर’ गाडीतून हे तीन मित्र फिरत होते, तीच गाडी हल्ल्याच्या दिवशी राणा यांच्यासोबत होती आणि याच गाडीतून त्यांना सुरुवातीला बारामतीच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. या सर्व संशयास्पद हालचालींमुळे बारामती पोलिसांचा या तिघांवरील संशय आणखी बळावला असून, सध्या पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल धुमाळ, सागर पवार आणि रोहित तुपे अशी तिघांची नावे आहेत. सोशल मीडियात या तिघांचे ही राणा याच्यासोबत भरपूर फोटो आणि व्हिडिओ आहेत. या ठिकाणी ही सुपारी का दिली, ते हल्ले खोरांना का भेटले, एकच गाडी अनेक ठिकाणी कशी काय आढळून आली, असे अनेक प्रश्न पोलीस तपासात उघड होणार आहेत.  हेच तीन मित्र पुण्यातील ‘रुबी हॉल’ रुग्णालयातही राणा सूर्यवंशी यांच्यासोबत हजर होते.

आतापर्यंत ५ जणांना अटक

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात राणा यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर शिंदे याचाही समावेश आहे. शिंदे यानेच स्वप्निल कांबळेला सुपारी दिली होती. त्यानंतर स्वप्निलने पुढे ही सुपारी एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला आणि पार्थ अवथळे याला दिली. तर दुसरा आरोपी निनाद महाडिक याने या हल्ल्यासाठी आपली दुचाकी उपलब्ध करून दिली होती. सध्या हे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

वाय दर्जाची सुरक्षा १० किलोमीटर आधीच सोडली मागे

मिळालेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी यांना शासनाकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. मात्र, हल्ल्याच्या दिवशी त्यांनी सुरक्षारक्षकांना घटनास्थळापासून १० किलोमीटर आधीच थांबवले होते. “मला जमिनीची पाहणी करायची आहे आणि एका व्यवहाराबाबत चर्चा करायची आहे,” असे कारण देत त्यांनी सुरक्षा मागे सोडली होती. यावेळी त्यांच्यासोबत एक पोलीस जवान उपस्थित होता. मात्र, हल्ला झाल्यानंतर आरोपींनी त्या पोलीस जवानाच्या हाताला चावा घेऊन तिथून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

“आम्ही तुमचे फॅन आहोत” म्हणून जवळ गेले मारेकरी

दिलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बारामती विमानतळाजवळ राणा सूर्यवंशी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. पार्थ अवथळे आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाने प्रत्यक्ष हल्ला केला. “आम्ही तुमचे फॅन आहोत,” असे म्हणत हे दोघे राणा यांच्या जवळ गेले आणि आधी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सत्तूराने त्यांच्या हातावर वार केले. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे या प्रकरणाला आता एक नवे आणि मोठे वळण मिळाले असून, यामागील नेमके राजकारण किंवा वैमनस्य काय होते, याचा पोलीस सखोल शोध घेत आहेत.

Exit mobile version