Ajit Pawar News : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी वाढल्याच्या बातम्या रोजच येत आहेत. अजित पवार यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या बैठकीचा विषय चांगलाच गाजला. मु्ख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचे झेंडावंदन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सीएमच्या खुर्चीवर डोळा असल्याच्या बातम्यांची भर पडली. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या या चर्चांचा अपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.
पुणे शहरातील चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजितदादांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. काँग्रेसवर जोरदार टीका तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शेलक्या शब्दांत सुनावलं. त्यांच्या शब्दफेकीने कार्यक्रमास उपस्थित असलेले पुणेकरही खळखळून हसले. पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात कोल्डवॉर? काँग्रेसच्या आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्रीही एकदा येथील ट्राफिकमध्ये अडकले होते. चांदणी चौकाने कुणालाच सोडले नाही. तब्बेतीच्या कारणानं आज ते आले नाहीत. याची प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विशेष नोंद घ्या. कारण काहीही बातम्या चालवल्या जात आहेत. एका बाजूला देवेंद्र फडणवीस होते दुसरी बाजू रिकामी होती तिथे मी आलो मग बिघडलं कुठं? असा सवाल त्यांनी केला.
अर्थमंत्री म्हणून आढावा बैठक घेतच असतो. पण, काहीही झालं तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेत असतात. तरी देखील अजितदादांनी मिटींग घेतली. दोघांत कोल्डवॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या. अरे बैठक घेतली तर तुमच्या का पोटात दुखलं, तुम्हाला यात काय कोल्डवॉर दिसलं. विरोधी पक्षनेते सुद्धा काहीही बोलतात. त्यांना कुठं काय दिसलं. म्हणे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा आहे. अरे एकाच खुर्चीवर दोघांचा डोळा कसा असेल. ती खुर्ची सुद्धा भरलेली आहे ना. खरंतर मला हे बोलायच नव्हतं. एकच बाजू लोकांना दिसते दुसरी दिसत नाही. आम्ही कामाची माणसं आहोत, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधी पक्षांवर घणाघाती टीका केली.
Karnataka Politics : विधानसभेत 135 जिंकल्या, लोकसभेत किती? मुख्यमंत्र्यांनी थेट आकडाच सांगितला
आम्ही पुणेकर आहोत. पुणे शहराला जोडणारे रस्त्यांवरील वाहतुकीची सोय व्हावी म्हणून उड्डाणपूल करायचे आहेत. त्यासाठी गडकरींनी 40 हजार कोटींची तयारी दाखवली असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावरही अजित पवार यांनी सांगितलं की अरे त्यांनी चाळीस हजार कोटी देण्याची तयारी दाखवली तुम्ही चाळीस रुपयांसारख्या काय टाळ्या वाजवता. यानंतर मात्र उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अजित पवार पुढे म्हणाले, काही पत्रकारांना हे सुद्धा माहित नसतं. झेंडावंदन कोण करतं. 15 ऑगस्टचं झेंडावंदन हे राज्यपाल करतात. मंत्रालयासमोर 15 ऑगस्टचे ध्वजारोहण मुख्यमंत्री आणि 26 जानेवारीचे राज्यपाल करतात. ही वर्षानुवर्षे परंपरा आहे. पण यांना मात्र अजितदादा झेंडावंदन करणार की चंद्रकांतदादा करणार याचंच पडलं आहे. तुम्हाला काय देणघेण आहे. काही बातम्या काढतात का रे असा सवाल उपस्थित करत उगाच काहीतरी करून गैरसमज करू नका. माहिती नसेल तर माहिती घ्या, अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमांनाही फटकारलं.