Download App

कसब्याचे किंगमेकर हरपले; गिरीश बापटांना राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

 

बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्व गमावले – मुख्यमंत्री शिंदे

 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती.

आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.  असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

 

शेतकरी व कामगारांसाठी बापटांचे कार्य – फडणवीस  

 

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. शेतकरी व कामगार हे त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते.

 

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

 

 

 

राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे नेतृत्व गमावले विखे

 

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधीमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. पण राजकारणात फार कटूता येवू न देता संवादामुळे सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

– राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री   

 

पुण्यात भाजप मजबूत करण्याते बापटांचे योगदान – गडकरी

गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात, मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीशजी कायम स्मरणात राहतील.

महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो.

– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 

 

 

‘खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली’

– शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनाने एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

– खासदार सुप्रिया सुळे

पुणे जिल्ह्याचे नेतृत्व हरपले – अजित पवार

काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजाराशी ते लढा देत होते. बरे होऊन ते पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील असा विश्वास होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनाने पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्व हरपले.

– अजित पवार, विरोधी पक्षनेते 

 

बापट माझे जवळचे मित्र – अंकुश काकडे

पुणे शहराच्या राजकारणात मागील 40 वर्षांपासून कार्यरत असलेले गिरीश बापट माझ अतिशय जवळचे मित्र होते. मागील 35 वर्षांपासून आम्ही राजकारणात एकत्र काम केले.

– अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस

 

आमचा मार्गदर्शक हरपला – पाटील

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार गिरीश बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

बापट यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. त्यांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला.

– चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पुणे

 

जवळचा सहकारी काळाने हिरावला – खडसे

गेल्या अनेक वर्षांपासूनचा माझा सहकारी काळाने हिरावून नेला. मागील 35 वर्षांपासून आम्ही पक्षात काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व ज्या ठिकाणी नव्हते अशा ठिकाणी काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आणि माझ्यावर दिली होती. पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत उपेक्षित होता. त्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याठिकाण यशही मिळवले. नंतर आमदारांची संख्या वाढली. पुण्यात त्यांचा दबदबा होता. त्यांच्याबद्दल आदर होता. माझा जवळचा मित्र गेला.

– एकनाथ खडसे

Tags

follow us