Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Lok Sabha Election 2024) यांना मिळालं. तर तुतारी वाजविणारा माणूस हे नव पक्ष चिन्ह शरद पवारांच्या गटाला मिळालं. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना ही मोठी घडामोडी घडली. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्ष चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षातील नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या स्वतः मतदारांना फोन करत आहेत. या संबंधीचा एक कॉल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये सुप्रिया सुळे आपल्या पक्षाचे तुतारी चिन्ह गावात पोहोचले का असा प्रश्न करत आहेत. त्यावर समोरील व्यक्तीने मी तुतारीचे नाही तर अजितदादांचे काम करतोय असे उत्तर दिले.
अजित पवार यांनी बंड (Ajit Pawar) केल्यानंतर पक्षात मोठ्या उलथापालथी झाल्या. शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. पुढील काळात त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्हा निवडणूक आयोगाने अजित पवार यांना दिले. त्यामुळे शरद पवार गटाला नवीन नाव आणि पक्षचिन्ह घ्यावे लागले. विशेष म्हणजे, पक्षचिन्हासाठी जे तीन पर्याय दिले होते त्यातील एकही पर्याय आयोगाने मान्य केला नाही आणि तुतारी हे चिन्ह पक्षाला दिले.
निवडणुका जवळ आलेल्या असताना हे पक्षचिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान शरद पवार आणि त्यांच्या आमदार, खासदारांसमोर आहे. या नेतेमंडळींनी प्रयत्नही सुरू केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी तर प्रचारही सुरू केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहे. यात सुप्रिया सुळे तुतारी पक्षचिन्हाचा प्रचार मतदारांत करत आहेत. दुसऱ्या बाजूने बोलणारा व्यक्ती काहीसा दबावात असल्याचे दिसून येत आहे. तो सुप्रिया सुळेंना स्पष्टपणे सांगतो की ताई आम्ही वहिनींचे काम करत आहोत, आम्ही दादांसोबत आहोत. सध्या सोशल मीडियावर या कॉलची मोठी चर्चा होत आहे.
फोन कॉलमध्ये नेमकं काय?
या कॉलमध्ये सुप्रिया सुळे मतदाराला आपला तुतारीवाला माणूस पोहोचला की नाही गावात, असे विचारतात. त्यावर बारामतीकर व्यक्ती म्हणतो नाही ताई. सुप्रिया सुळे पुन्हा म्हणतात अरे पक्षचिन्ह आहे आता, तुतारीवाला माणूस पक्षाचं चिन्ह पोहोचलं की नाही तुम्हाला. त्यानंतर हा व्यक्ती सांगतो की ताई आम्ही वहिनींचं काम करतोय, दादांचं. यावर सुप्रिया सुळे म्हणतात की करा, मी तुम्ही माझे मतदार आहात ना, मग माझे कर्तव्य आहे ही लोकशाही आहे, असा संवाद ऐकायला मिळतो.