पिंपरी-चिंचवड हादरलं! आर्थिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्या; पतीनंतर पत्नी आणि मुलीचाही मृत्यू

उपचार सुरू असलेल्या पत्नी सिरजा पिल्ले आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले यांचाही वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Untitled Design   2026 08 02T115450.379

Untitled Design 2026 08 02T115450.379

Mass suicide due to financial distress : पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात घडलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी रसायनाचा धूर घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत सुरुवातीला कुटुंबप्रमुख विनोद पिल्ले यांचा मृत्यू झाला होता. तर गंभीर अवस्थेत उपचार सुरू असलेल्या पत्नी सिरजा पिल्ले आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले यांचाही वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत संपूर्ण पिल्ले कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले आहे.

मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये राहणारे विनोद पिल्ले (50), पत्नी सिरजा पिल्ले (45) आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले (19) यांनी घरात विषारी रसायनाचा धूर करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच विनोद पिल्ले यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या सिरजा आणि पूर्णिमा यांचीही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

या घटनेचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा सिरजा पिल्ले ज्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या, तेथे त्या कामावर न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोनला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनाही संपर्क साधता आला नाही. संशय आल्याने नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले असता दरवाजा फक्त लोटलेला असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश करताच तिघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यानंतर तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.

शरद पवारांनी संघटनेत भाकरी फिरवली; युवक, युवती आणि विद्यार्थी आघाडीत केल्या नव्या नियुक्त्या

घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये विनोद पिल्ले यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे नमूद केले होते. तसेच आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवले होते. प्राथमिक तपासात विनोद पिल्ले यांनी काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने सोडियम नायट्रेट हे रसायन मागवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून त्यांनी आत्महत्येसंदर्भातील माहिती इंटरनेटवरून मिळवली असावी, अशी शक्यता तपासली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पिल्ले कुटुंबीय मध्यरात्रीपर्यंत जागे होते. मुलगी पूर्णिमाने पहाटे सुमारे अडीच वाजता सोशल मीडियावर सक्रियता दाखवली होती. त्यानंतर घरात कोळसा जाळून त्यावर विषारी रसायनाचा वापर करण्यात आला आणि त्यातून निर्माण झालेला धूर घेतल्याने तिघेही बेशुद्ध पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे हे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित होते. विनोद पिल्ले यांनी उच्च शिक्षण घेतले होते आणि ते नोव्हेंबर 2024 पर्यंत एका खासगी कंपनीत कार्यरत होते. मुलगी पूर्णिमा चिंचवड येथील एएसएम महाविद्यालयात संगणकशास्त्राच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तर सिरजा पिल्ले या मोरवाडीतील एका नामांकित शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या.

“संबंध सिद्ध करा, एका मिनिटात राजकारण सोडेन”; दिलीप वळसे पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आर्थिक अडचणींमुळे पिल्ले कुटुंबाने काही वर्षांपूर्वी नेहरूनगर येथील स्वतःचा फ्लॅट विकला होता. त्यानंतर ते मोरवाडी परिसरातील भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. वाढते आर्थिक संकट, कर्जाचा बोजा आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा संत तुकारामनगर पोलीस अधिक तपास करत असून कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांची, मोबाईलमधील माहितीची आणि सुसाइड नोटमधील तपशीलांची चौकशी सुरू आहे. एका उच्चशिक्षित आणि सुशिक्षित कुटुंबाचा अशा प्रकारे झालेला दुर्दैवी अंत पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Exit mobile version