महाराष्ट्रात दूध दरवाढीचा भडका; 16 नोव्हेंबरपासून नवे दर; वाचा, वारंवार दूध का महागतयं?

Milk Price Hike In Pune दूध दरवाढीनंतर अनेकांच्या तोंडावर एकच प्रश्न येतोय, "अरे बापरे! पुन्हा दूध महागलं? हे नेमकं चाललंय काय?

Milk Price Hike In Pune

Milk Price Hike In Pune

Milk Price Hike In Maharashtra Why Price Of Milk IncreasedDay By Day : सकाळी उठल्याबरोबर वाफाळलेला चहा असो, लहान मुलांचं एक ग्लास दूध असो, किंवा जेवणातलं गोड दही-ताक असो… आपल्या भारतीय घरांची सकाळ दुधाशिवाय उजाडतच नाही. पण, नुकतंच अमूल आणि मदर डेअरीसारख्या मोठ्या ब्रँड्सनी दुधाचे भाव वाढवले आहेत आणि आता महाराष्टातही सोमवार (ता. 16) नोव्हेंबरपासून गाय व म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. त्यामुळे अनेकांच्या तोंडावर एकच प्रश्न येतोय, “अरे बापरे! पुन्हा दूध महागलं? हे नेमकं चाललंय काय?” भारत जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश असतानाही वारंवार दूध का महागतंय?” याचं उत्तर अगदी सोप्या भाषेत आणि एका वेगळ्या स्टाईलने समजून घेऊया…

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या दरवाढीवर शिक्कामोर्तब झालयं. या बैठकीला राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे 50 प्रतिनिधी उपस्थित होते. दूध दरवाढीसोबतच बैठकीत पनीर, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10 टक्क्यांपर्यंत वाढ होणार असून, सोमवार (दि..16) नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. गेल्या काही काळात डिझेल, वाहतूक, साखर, पॅकिंग साहित्य आणि मनुष्यबळाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे; तसेच दूध खरेदी दरही वाढले आहेत. या वाढत्या खर्चाचा समतोल साधण्यासाठी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी स्पष्ट केले.

आता ग्राहक म्हणून आपल्याला वाटतं की, ‘दूध महागलं म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशात खूप पैसे जात असतील. पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. दुधाची किंमत वाढल्यामुळे जरी कंपन्या शेतकऱ्यांना थोडे जास्त पैसे देत असल्या, तरी चारा आणि औषधपाण्याचा खर्च त्याहून कितीतरी पटीने वाढलाय. त्यामुळे दूध महाग होण्याचा अर्थ असा नाही की, शेतकरी श्रीमंत होतोय. तो देखील या वाढत्या महागाईच्या चक्रात अडकलाय. आपल्या देशातील तब्बल 95 % दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे फक्त 1 ते 5 जनावरे आहेत त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकताना त्यांची प्रचंड दमछाक होतेय.

गेल्या चार वर्षांत, अमूल आणि मदर डेअरीच्या काही प्रकारच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 18 ते 19 रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये अमूल गोल्ड 58 रुपये प्रति लिटर दराने, तर मदर डेअरीचे फुल-क्रीम दूध 57 रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. पण. 12 नोव्हेंबर 2026 रोजी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रति लिटर 2 ते 4 रुपयांची वाढ केली. आता, या दोन्ही प्रमुख ब्रँडचे फुल-क्रीम दूध 76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

महागड्या दुधाची खरी कहाणी सुरू होते एका लहानशा गावापासून, जिथे एखादा शेतकरी किंवा पशुपालक आपल्या जनावरांची जीवापाड काळजी घेत असतो. या संपूर्ण प्रवासात महागाईची पहिली ठिणगी पडते ती पशूंच्या खाद्यामध्ये. हवामानाचा लहरीपणा, कुठे कमी पाऊस तर, कुठे दुष्काळ या सगळ्याचा थेट परिणाम चाऱ्याच्या उपलब्धतेवर झालाय. त्यात गेल्या काही वर्षांमध्ये हिरवा आणि सुका चारा चक्क 20 टक्क्यांनी महागलाय. मका, पेंड आणि इतर पशुआहार देखील 10 टक्क्यांनी महागलेत. कंपन्यांच्या मते, दुधाच्या दरवाढीचे मुख्य कारण वाढलेला उत्पादन आणि प्रक्रिया खर्चही आहे. याशिवाय, दूध पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक फिल्म, इंधन आणि वाहतुकीचा खर्चही वाढला आहे.

फुल क्रीम दूध 4 रूपयांनी महागलं

अमूल आणि मदर डेअरीने 12 नोव्हेंबरपासून दुधाच्या दरात वाढ केली आहे. टोंड दूध 2 रुपये आणि फुल क्रीम दूध तब्बल 4 रुपयांनी महागलंय. यामागचं मुख्य कारण आहे दूधामधील ‘फॅट. टोंड दुधामध्ये 3 % फॅट असतं, तर फुल क्रीम दुधामध्ये थेट 6% फॅट असतं म्हणजेच दुप्पट फॅट. आजकाल बाजारात लोणी आणि इतर फॅटयुक्त पदार्थांचे भाव आकाशाला भिडले आहेत. एवढेच नव्हे तर, गेल्या काही वर्षांत बटरचे भाव 50 टक्क्यांहून अधिक वाढलेत. त्यामुळे डेअरी उद्योगासाठी जास्त फॅट असलेला दुधाचा प्रत्येक थेंब सोन्यासारखा महागात पडतोय. म्हणूनच, जास्त फॅट असलेल्या फुल क्रीम दुधावर महागाईचा भारही सर्वाधिक पडलाय.

दूध महाग होण्यामागे केवळ उत्पादन घटणे हेच एकमेव कारण नाही, तर उत्पादन आणि मागणी यांच्यातील ताळमेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पण एक गोष्ट नक्की घडलीये ती म्हणजे उत्पादन वाढण्याचा वेग मंदावलाय. तर, दुसरीकडे, देशाची लोकसंख्या वाढतीये, लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलतायेत, पनीर, तूप, मिठाई आणि आईस्क्रीमची मागणी दिवसेंदिवस रॉकेट वेगाने वाढतीये. म्हणजेच काय मागणी प्रचंडय आणि पुरवठ्यासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे साहजिकच किमतींवर मोठा दबाव वाढतोय.

सरकारी आकडेवारी काय सांगते?

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. पशुपालन आणि डेअरी विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात 2024-25 मध्ये दूध उत्पादन 24.787 कोटी टन म्हणजेच सुमारे 3.58 % वाढ झालीये. देशात प्रति व्यक्ती दुधाची रोजची उपलब्धता 485 ग्रॅम आहे. यामध्ये उत्तर प्रदेश (15.66%) आणि राजस्थान (14.82%) ही देशातील अव्वल दूध उत्पादक राज्ये आहेत.

भारतात दूध थेट पिण्याव्यतिरिक्त, त्याचा उपयोग दही, चीज, तूप, लोणी, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठीही केला जातो. USDA च्या अहवालानुसार, 2026 पर्यंत भारतातील देशांतर्गत दुधाचा वापर अंदाजे 22.19 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यातील अंदाजे 9.3 दक्षलक्ष दूध थेट पिण्यासाठी आणि 12.9 दशलक्ष टन दूध कारखान्यांमध्ये वापरले जाण्याचा अंदाज आहे.

थोडक्यात काय तर, दूधाचं गणित नुसतं प्लास्टिकच्या पिशवीवर छापील किंमत वाढवण्याचं नाहीये. यात शेतकरी ते डेअरी, पशुआहार ते पॅकेजिंग, आणि इंधनापासून ते वाहतुकीपर्यंतचा संपूर्ण खर्च जोडलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण जनावरांची उत्पादकता वाढवण्यावर आणि चारा-खाद्याचे भाव आटोक्यात आणण्यावर ठोस काम करत नाही, तोपर्यंत दर काही महिन्यांनी दुधाच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला असाच ‘शॉक’ देत राहणार यात काही शंका नाही.

Exit mobile version