Download App

नाराज बेनकेंची समजूत काढण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्टिव्ह; भुजबळ घरी जाऊन काढणार समजूत

पुणे : दादा आणि काकांच्या संघर्षाला कंटाळून निवडणूक न लढविण्याची घोषणा केलेल्या आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. बंडखोर नेते आणि मंत्री छगन भुजबळ आज (10 जुलै) अतुल बेनके यांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, बेनके यांच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (Minister chhagan Bhujbal will visit NCP MLA Atul Benke Home in junnar)

दरम्यान, मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येत आहेत. याच दरम्यान, नाशिकहून पुण्याला येताना ते आमदान बेनके यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. मंत्री झाल्यानंतर फुले वाड्यावर जाऊन ते नतमस्तक होणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आमच्यासाठी ऊर्जास्थान आहेत. त्यांचे आशिर्वाद घेऊन पुढील कामाला सुरुवात करणार आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं. त्यानंतर भुजबळ पुण्यात अनेक महत्वांच्या नेत्यांची भेटीगाठी घेणार आहेत.

अतुल बेनके नाराज?

गेल्या आठवड्यात रविवारी अजित पवार पक्षातील 32 ते 35 आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह 9 आमदारांचा मंत्रिमंडळातही समावेश करण्यात आला. त्यानंतर अजित पवारांनी थेट पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावे घेतले आहेत. त्यात दोघांनी आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. चाळीसपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजितदादांनी केला आहे.

अशात काही आमदार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मोठा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीच्या फुटीवर बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्याबरोबर पुढील 2024 ची निवडणूक लढविणार नसल्याचेही बेनके यांनी जाहीर केले आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांची बेनके यांनी भेट घेतली. त्यानंतर बेनके म्हणाले, ज्यांना जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या, मी तटस्थ राहणार आहे. पाणी प्रश्नासाठी संघर्ष करणार पण निवडणूक लढणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं.

याशिवाय नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे यांनीही आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. भूमिका जाहीर न करणारे आमदार आता बोटावर मोजण्या इतकेच राहिले आहेत. रविवारीच नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार किरण लहामटे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडे आमदारांची संख्याबळ वाढलेले आहे.

Tags

follow us