Download App

पुण्यातील गरबा कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णींचा हस्तक्षेप; आवाजाची मर्यादा ओलांडल्याने थेट कारवाई

पुणे शहरात गरबा कार्यक्रमाला अचानक थांबवण्यात आलं, हा निर्णय घेतला तो भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी.

  • Written By: Last Updated:

MP Medha Kulkarni Action On Garba Program in Pune : पुणे शहरात नवरात्रीच्या उत्साहात सुरू असलेल्या एका गरबा कार्यक्रमाला अचानक थांबवण्यात आलं, मात्र हा निर्णय घेतला तो कुणा प्रशासनाने नव्हे तर थेट भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी. संबंधित कार्यक्रमात आवाजाची मर्यादा मोठ्या प्रमाणावर ओलांडली जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर कुलकर्णी यांनी स्वतः उपस्थित राहून आयोजकांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितले.

प्रशासनाकडून ठोस कारवाई

खासदार कुलकर्णी यांनी (MP Medha Kulkarni) यासंदर्भात प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, आवाजाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळेच मला स्वतः पुढे येऊन कार्यक्रम थांबवावा लागला. त्यांच्या या (Garba Program) वक्तव्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यासारख्या (Pune) गजबजलेल्या शहरात सण-उत्सव काळात आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा वाढते, याची नागरिकांकडून वारंवार तक्रार होत असते. मात्र, प्रशासनाकडून वेळेत उपाययोजना होत नसल्यामुळे त्रस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर खासदारांचा हस्तक्षेप ही अभूतपूर्व बाब ठरली आहे.

नियम सर्वांसाठी सारखे

या घटनेनंतर गरबा आयोजक आणि स्थानिक नागरिक यांच्यात मतभेदही निर्माण झाले आहेत. काही जणांनी खासदारांच्या कृतीचं समर्थन केलं असून, नियम सर्वांसाठी सारखे असायला हवेत, असं मत व्यक्त केलं. तर काहींनी, “सार्वजनिक कार्यक्रमात थेट हस्तक्षेप करणे योग्य नाही, यासाठी प्रशासनानेच जबाबदारी घ्यावी,” अशी प्रतिक्रिया दिली.

एकूणच, या प्रकारामुळे आवाजाच्या नियमांची अंमलबजावणी, प्रशासनाची भूमिका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिस्त या तिन्ही मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

follow us