Download App

Letsupp Special : फडणवीसांपासून शेळकेंपर्यंत… पवार मैदानात उतरतात तेव्हा भल्या भल्यांचा घाम काढतात!

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मात्र टोमणे मारण्यासोबत पवार कधीकधी थेट दम द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचे उदाहरण आपण मावळ तालुक्यात पाहिले.

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी माजी मंत्री, माजी आमदार आणि पवारांचे जवळचे मित्रे मदन बाफना (Madan Bafana) यांना दमबाजी केल्याची तक्रार पवारांच्या कानावर आली. त्यावर पवारांनी थेट सभेत जोरदार उत्तर दिले. (Nationalist Congress Party (Sharad Chandra Pawar) President Sharad Pawar stands out among the current political leaders in his style of thrashing.)

सुनील शेळकेंना फैलावर घेताना ते म्हणाले की, तू आमदार कुणामुळे झाला? त्यावेळी सभेला इथे कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? असा खडा सवाल पवारांनी आमदार सुनील शेळकेंना उद्देशुन केला. मला शरद पवार म्हणतात, हे लक्षात असू दे. माझ्या वाटेला गेला की मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दांत पवारांनी जाहीर दमही दिला.

दमबाजीचे यापूर्वीचे दोन प्रसंग :

असाच प्रसंग 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात घडला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांना विरोधी उमेदवाराकडून अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्याकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पवारांकडे करण्यात आल्या होत्या. त्याचा समाचार पवारांनी घेतला. इथं दमदाटी कोणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. आम्ही सरळला सरळ आहे. पण कोणी वाकडं पाऊल टाकलं तर पाय काढायला मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी पवारांनी जाहीर सभेत दिली.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला येणार वेग ; 40 हजार कोटींची गुंतवणूक

विधानसभेच्या 2004 निवडणुकीच्या पुण्यातील तत्कालीन बोपोडी मतदारसंघात चंद्रकात छाजेड हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले एक पहिलवान उमेदवार होते. त्या निवडणुकीत हे पहिलवान उमेदवार बरीच दमदाटी करत आल्याच्या तक्रारी पवारांपर्यंत गेल्या होत्या. छाजेड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पवार यांनी विरोधी उमेदवाराचा सारी मस्ती एकाच वाक्याने उतरवली होती. “आमच्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर, सात जन्माची अद्दल घडेल, असा धडा शिकवेल” हे वाक्य पवार यांनी असे उच्चारले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तेथील निवडणूक प्रचार सुरळीत पार पडला होता.

पार्थला आला आहे रागाचा अनुभव :

शरद पवार यांनी फार कौतुक केले आणि किंवा ते फार चिडले या दोन्ही गोष्टी तशा धोकादायक समजल्या जातात. काही वर्षांपूर्वी शरद पवार आपल्या नातवाविषयी चिडून बोलले होते. नातू पार्थ पवार हा इमॅच्युअर असल्याचे सांगत ‘त्याच्या शब्दाला कवडिचीही किंमत नसल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते’. पवार असे घरच्यांविषयी चिडून बोलल्याचे हे पहिलेच उदाहरण होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी घरोबा केला तेव्हाही पवार अजितदादांविषयी जाहीररित्या इतके कडवटपणे बोलले नव्हते. हा कडवटपणा पार्थच्या बाबतीत मात्र दिसून आला. पार्थविषयीचा प्रश्न ते टोलवू शकत होते. तो प्रश्न आणि पार्थची भूमिका दुर्लक्षित करणे सहज शक्य होते किंवा वडिलकीचा सल्ला देत पार्थला योग्य तो संदेशही देऊ शकत होते. मात्र ते सारे टाळत `एक घाव दोन तुकडे`, असेच पवारांनी केले.

राज ठाकरे यांची उडवलेली खिल्ली…

पवारांची अशी अनेक विधाने आहेत की ज्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना घायाळ केले किंवा टोमणे मारून त्यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे यांना दिलेला सल्ला हा त्यांच्या या शैलीचा सर्वोत्तम नमुना आहे. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली. त्यावेळी पवारांना मनसेची कामगिरी भविष्यात कशी राहील, असा आशयाचा प्रश्न विचारला होता. त्यावर “राज ठाकरे यांना त्यासाठी आधी लवकर उठायची सवय करून घ्यावी लागेल”, असा सल्ला देत पवार यांनी राज यांची खिल्लीच उडवली होती.

फडणवीसांची खिल्ली :

गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासमोर मैदानात कोणी पहिलवानच नाही, अशी वल्गना केली होती. या टिकेला जाहीर सभांतून प्रत्युत्तर देताना हातवारे करत कुस्तीसाठी पहिलवान असावा लागतो. `असल्या` पहिलावनाबरोबर कोण कुस्ती करणार, असे प्रत्युत्तर पवारांनी दिले होते.

उपहास हे अस्त्र :

शरद पवार हे जसे टोमणे मारण्यासाठी ओळखले जातात, किंवा कधी तरी चिडून दम देताना दिसतात, तसेच उपहास हे त्यांचे अस्त्र आहे. समजा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावर टीका केली आणि पवारांना उत्तर द्यायचे नसेल तर ते “पाटील हे महाराष्ट्रात प्रचंड जनाधार असलेले नेते आहेत. त्यांच्याविषयी मी काय बोलणार”, असे उत्तर देऊन ते वेळ टाळतात.

निलेश लंके लोकसभेची ‘तुतारी’ फुंकणार का? तनपुरेंचं सूचक विधान

काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहत असताना प्रभा राव या पवारांविषयी थोड्या टोकाचे बोलल्या होत्या. तेव्हा प्रचंड लोकप्रिय काँग्रेस अध्यक्षा, असा त्यांचा उल्लेख करून पवारांनी त्यांना दुर्लक्षित केले होते.

सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले हे काही वर्षांपूर्वी भाजपचे खासदार होते. भाजपचा त्याग करण्यापूर्वी ते शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करत होते. शेतकरी आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न होत्या. पुण्यात पत्रकार परिषदेत पवारांना पटोलेंच्या या आंदोलनाविषयी पत्रकारांनी पवारांना विचारले. त्यावर, `जरा शहाण्या माणसाविषयी विचारा`, असे म्हणून पटोलेंची आपण दखल घेत नसल्याचे पवारांनी दाखवून दिले होते.

शरद पवार अन् जातीचा उल्लेख :

2016 मध्ये कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार केले होते. त्यावर पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले होते. ‘या आधी छत्रपती हे पेशव्यांची निवड करत होते. आता फडणवीस हे छत्रपतींची नियुक्ती करत आहेत, ‘अशी प्रतिक्रिया देऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संभाजीराजे दोघांनाही टोमणा मारला होता. तसेच या विधानातून आपल्या पाठिराख्यांसाठी योग्य तो संदेशही दिला होता.

शरद पवार व राजू शेट्टी यांच्यात आता सलोखा असला तरी हे दोघे एकमेकांवर तुटून पडत होते. बारामती येथे पवारांच्या बंगल्यासमोर शेट्टी यांनी 2012 मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी बारामती येथील जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर टीका करत ‘राजू शेट्टी कोण? त्यांची जात काय, शेतीच्या प्रश्नांशी आणि उसाच्या भावाशी त्यांचा संबध काय? शेतकरी आणि त्यांच्या समाजात फरक आहे. ‘आमचे’ कारखाने बंद आहेत आणि ‘त्यांचे’ कारखाने चालू आहेत, ’ अशी टीका करत त्यांची ‘जात’ काढली होती.

१९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मनोहर जोशी’ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले होते. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या प्रमोद महाजन यांना युती सरकारचे शिल्पकार म्हटले गेले. सरकारचे शिल्पकार महाजन आणि मुख्यमंत्री जोशी याचा आधार घेत शरद पवार यांनी त्यावेळी ‘जोशी-महाजनांचं सरकार’ अशी जातीय शेरेबाजी केली होती. पुढं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरही पवारांनी याच पद्धतीने जातीय शेरेबाजी करण्याची संधी घेतली.

पृथ्वीराज चव्हाणांवर खालच्या पातळीवर टीका

पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तसे फारसे सख्य नव्हते. चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या फाईल अडकल्या होत्या. त्यावर चव्हाण हे स्वाक्षरी करत नव्हते. त्यावेळी चव्हाण यांच्या हाताला लकवा झाल्यामुळे हात थरथरतो आहे का? अशी विचारणा पवारांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात केली होती.

एका वाक्याने फिरल्या निवडणुका :

पुण्यातील 2007 ची महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने कसून लढली होती. त्या वेळी काँग्रेसच्या नेतृत्त्वात पुण्याचा कारभार सुरू होता. पुण्यात सारसबागेजवळ झालेल्या प्रचाराच्या प्रारंभीची सभा पवारांनी गाजवली. “भाकरी फिरवली नाही तर ती करपते… तसेच पुण्याचा कारभार बदला नाहीतर शहराचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा दिला होता. त्यांचा कारभारी बदला, या वाक्याचा निवडणुकीत मोठा परिणाम झाला.

पुरंदरमध्ये 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे ज्येष्ठ नेते दादा जाधवराव हे राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवत होते. त्यावेळी एका सभेत जाधवरावांवर टीका करताना ‘म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागेल’, असे आवहान मतदारांना केले होते. ते मतदारांना पटले होते आणि त्यानंतर जाधवराव यांचा पराभ झाला होता.

असेच ते 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, ‘म्हाताऱ्या बैलाला आता घरी बसवा’ असे राष्ट्रवादीपासून फारकत घेतलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना उद्देशून म्हणाले होते. पण त्यावर कोल्हापूरकरांनी पवार यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट कोल्हापूरच्या मतदारांनी राजघराण्यातील उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला आणि मंडलिकांना निवडून दिले.

पत्रकारांनाही फटकारण्याची शैली :

शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना पुण्यात परिषद झाली होती. त्यात रिलायन्स पुणे जिल्ह्यात खासगी साखर कारखाना सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी या परिषदेत बोलताना दिली होती. त्यावर बरेच राजकीय वादळ नंतर उठले होते. ही परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी साहजिकच रिलायन्सविषयी पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी ‘मी काय रिलायन्सचा प्रवक्ता आहे का’, असे म्हणत त्यांनी फटकारले.

पुण्यात एकदा अडचणीचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला त्या वेळी ‘पुण्यातील जर्नलिझम कॉलेजची क्वालिटी इतकी घसरली आहे, हे मला माहीत नाही’, असे चिडून उदगार काढले होते.

सुरेश कलमाडी यांनी 1998 च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा त्याग केला होता. त्यामुळे पुण्यात काँग्रेसचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू होती. त्यावर पत्रकाराने “पवार साहेब तुम्ही मग पुण्यातून उभे राहण्याचे आव्हान स्वीकारणार का”, असा बेधडक सवाल केला. त्यावर चिडलेल्या पवारांनी इमॅच्युअर प्रश्न म्हणून चिडून उत्तर दिले होते. जाहीरपणे इमॅच्युअर हा शब्द त्यांनी परत पार्थसाठीच वापरला.

शरद पवार यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. तुम्हाला कोणती आठवत आहेत का? ते काॅमेन्ट बाॅक्समध्ये आवर्जून लिहा.

follow us