बारामती : “पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे, या काळात मुंबईलाही जाणार नाही, मी माझ्या घरच्यांना सांगितले आहे, 10 महिने तुमचे तुम्ही बघा” अशी मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या दौंड येथील जाहीर सभेत बोलत होत्या. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या आव्हानाचा धसका तर घेतला नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. (NCP (Sharad Pawar group) MP Supriya Sule will stay in Baramati for 10 months.)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे. इलेक्शन असू दे किंवा नसू दे.. आरोप प्रत्यारोप होतच राहतात. पण आता मतदान होईपर्यंत मी आहे तुमच्यासोबत. मी तर आता माझ्या घरी पण सांगितले आहे की, 10 महिने माझी गाडी मुंबईला येणार नाही. तुम्हाला आई किंवा बायको पाहायची असेल तुम्ही पुण्यात, बारामतीत किंवा इंदापुरात या. म्हटले 10 महिने का? तर एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक होणार आहे.त्यानंतर ऑक्टोबर महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी ही जागा आपलाच पक्ष लढवेल आणि निवडूनही येणार अशी घोषणा करत शड्डू ठोकला आहे. तर भाजपनेही या जागेवरुन मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अशात आता सर्वात सेफ मानल्या जाणाऱ्या त्यांच्या घरच्या मैदानावर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांनी नुकतेच कर्जतमध्ये बोलताना राज्यात बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढविणार आहोत, यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील टप्प्यातील चर्चा होईल, अशा सांगितले होते. तर भाजपनेही बारामती यंदा जिंकणार असा दावा केला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता काय होणार याकडे लक्ष लागले आहे.