पुणे : कोयता गँगवर (Koyta Gang) बक्षीस (Reward) लावण्यात आलंय. कोयता गँगच्या सदस्याला पकडून देणाऱ्याला तीन हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. बंदूक बाळगणाऱ्याला 10 हजार रुपयांचं बक्षीस पोलिसांनी (Pune Police)हे बक्षीस जाहीर केलंय, त्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी जोरदार टीका केलीय. पुण्यात पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावर ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, सरकारमध्ये काम करत असताना एखाद्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती सापडत नसेल तेव्हा अशा प्रकारची बक्षीसं जाहीर केली जातात. तुम्हाला आठवत असेल तर बघा वीरप्पन सापडत नव्हता, तेव्हा त्याच्यावर बक्षीस लावलं होतं. कधीकधी हिंदी चित्रपटांमध्येही आपण पाहिलं आहे की, गब्बर सिंगवर बक्षीस लावलं होतं. सरसकट अशा गोष्टी होत असतील तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्न निर्माण होईल. कारण पोलिसांचं कायदा आणि सुव्यवस्था चांगला ठेवणं हे कामचं आहे.
अशा प्रकारचं पोलिसांना आमिष दाखवून किंवा बक्षीस मिळणार असल्याचं सांगितल्यास एखादा पोलीस म्हणेल की, एखाद्यावर बक्षीस लागेल तेव्हाच मी त्याचा तपास करेल. त्यामुळं वास्तविक सीसीटीव्ही, खबऱ्यांकडून पोलिसांना त्यांची माहिती मिळत असते. त्यावेळी पोलिसांनी नोंद घेऊन बंदोबस्त करायचा असतो, असंही पवार म्हणाले.
पुढे पवार म्हणाले की, आत्ता हे जे बक्षीस सुरु करण्यात आलंय त्यामागं नेमकं काय कारण आहे? नवा पायंडा का पाडला जाताहेत? मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबद्दल समजून घेणार आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.