Pune Bazar Samiti Election : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून १५ पैकी उर्वरित ५ जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले नाही. एकूण १८ जागांपैकी व्यापारी-आडते आणि हमाल तोलणार गटाच्या ३ जागा वगळून विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघातील १५ जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत विकास सोसायटी मतदार संघातील एकूण ११ पैकी ७ जागांवरील उमेदवार शुक्रवारी (दि.१४) घोषित करण्यात आले होते. रविवारी (दि.१६) सकाळी सर्वसाधारण गटातील ३ आणि महिला प्रवर्गाची १ जागा व ग्रामपंचायत गटातील १ जागेवरील मिळून ५ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
सावित्रीबाई फुले विद्यापीठात चित्रीत केलेल्या ‘सल्तनत’ रॅप सॉंगवरुन वादंग – Letsupp
विकास सोसायटी सर्वसाधारण गटातून रहाटवडे विकास सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय दिनकर चोरगे (रहाटवडे), बाजार समितीच्या माजी उपसभापती अलका चरवड यांचे चिरंजीव कुलदीप गुलाबराव चरवड (वडगाव बुद्रुक), बाजार समितीचे माजी सभापती माणिकराव गोते यांचे चिरंजीव संदीप गोते (बिवरी-गोतेमळा) यांचा समावेश आहे. तर भारतीय जनता पक्षातून उरुळी कांचन येथील महादेव कांचन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी (दि.१५) पक्ष प्रवेश केला आणि रविवारी लगेचच त्यांच्या पत्नी प्रतिभा कांचन यांना महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, बाजार समितीवरील यापूर्वीच्या संचालक मंडळावरील तत्कालीन संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही दिसून आला आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघातील ४ पैकी ३ जागांवर पहिल्या यादीत उमेदवार घोषित करण्यात आले होते. राहिलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गटाच्या एका जागेवर नानासाहेब कोंडीबा आबनावे (बकोरी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.