फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात भाजप नगरसेवक आक्रमक; आंदोलनानंतर प्रशासनाची धडक कारवाई

Fergusson College Road Encroachment : फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांचेच आंदोलन.

News Photo   2026 11 17T190954.537

Fergusson College Road Encroachment

Fergusson College Road Encroachment : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला असून, त्यासाठी सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांना महापालिका सभागृहात आंदोलन करण्याची वेळ आली. (Pune) रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतूक कोंडीचा मुद्दा नगरसेवकांनी आक्रमकपणे मांडला. प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आणि फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. मात्र, त्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने मंगळवारी नगरसेवक रवी साळेगावकर, सुनील पांडे, निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांना प्रशासनाविरोधात भूमिका घ्यावी लागल्याने या आंदोलनाची महापालिका वर्तुळात विशेष चर्चा रंगली. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने हालचाली करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या रस्त्यावरील पदपथ आणि सार्वजनिक जागांवर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नव्हती. रस्त्यांवरील अनधिकृत व्यवसायांमुळे वाहनांच्या वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. परिणामी नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत होता. या प्रश्नावर सत्ताधारी नगरसेवकांनीच आंदोलन केल्याने विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी या प्रकारावरून भाजपला टोला लगावत प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, केवळ अतिक्रमण हटवून न थांबता संबंधित व्यावसायिकांचे परवाने, आवश्यक कागदपत्रे आणि व्यवसायाची वैधता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची भूमिका सत्ताधारी गटनेते गणेश बिडकर यांनी मांडली. पुणेकरांना सुरक्षित पदपथ, मोकळे रस्ते आणि अडथळेमुक्त वाहतूक मिळवून देण्यासाठी अतिक्रमणमुक्त पुण्याची मोहीम सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version