पुणे कोर्ट गोळीबाराच्या थरारात दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमधून ताब्यात

Pune court shooting masterminds custody पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय गोळीबार घटनेप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत मोठी कारवाई केली आहे.

Pune Court Shooting

Pune Court Shooting

Pune court shooting two masterminds custody from Pune three assailants apprehended from Daund : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याचा कट रचल्याचा संशय असलेल्या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. तर प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य तीन आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने दौंडमधून अटक केली आहे.

पुणे जिल्हा परिषद शाळांचा रोबोटिक्समध्ये डंका; 250 विद्यार्थ्यांची चमक, दोघांची दक्षिण कोरियासाठी निवड

पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्याचे नियोजन करणारे अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण यांना गुन्हे शाखेने पुण्यातून पकडले. दुसरीकडे, हल्ला केल्यानंतर पसार झालेल्या तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दौंड परिसरात सापळा रचला होता. अखेर या तिघांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले.

WhatsApp चं बहुप्रतीक्षित फीचर अखेर रोल आऊट; 14 दिवस आधी शेड्यूल करता येणार मेसेज, फोटो अन्…

शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात गोळीबार आणि कोयत्याने वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. सुरुवातीला ते दौंडच्या दिशेने आणि त्यानंतर सोलापूरकडे जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक तपासाला सुरुवात केली.

आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी त्यांच्या संभाव्य मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले होते. तसेच महत्त्वाच्या चेकपोस्टवर नाकाबंदी करून गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली. या शोधमोहीमेदरम्यान दौंडमध्ये तीन हल्लेखोरांना पकडण्यात आले. त्यांना पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जुन्या वैमनस्यातून हल्ल्याचा संशय

दरम्यान, या हल्ल्यामागे पूर्वीचे गुन्हेगारी वैर आणि जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेला मंदार किवळे हा २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता.

शुभम चव्हाण हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मंदार किवळे शिवाजीनगर न्यायालयात आला होता. याचवेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. शुभमच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणातील इतर फरार आरोपींना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी आठ ते दहा विशेष पथके तयार केली होती. या पथकांच्या शोधमोहीमेला यश आले असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आता आरोपींच्या चौकशीतून हल्ल्याचे नेमके नियोजन, त्यामागील कारण आणि इतर सहभागी व्यक्तींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version