Download App

पुण्यात मध्यरात्री गोळीबार! घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग, एक गंभीर

पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार घडला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

  • Written By: Last Updated:

Pune Crime News Nilesh Ghaywal Gang Firing : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांचा जोर वाढत चालल्याचं चित्र दिसत आहे. नुकतेच नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात 19 वर्षीय आयुष कोमकरचा जीव गेला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर तब्बल 12 गोळ्या झाडल्या, त्यापैकी नऊ गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आयुष हा आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा असल्याने टोळीने सूड उगवल्याचं समोर आलं. या घटनेची धग अजून थंडही झाली नसताना पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार घडला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री कोथरूड परिसरात गोळीबार (Pune Crime) झाला. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांकडून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. गाडीला पुढे जाण्यास जागा न दिल्याच्या किरकोळ वादातून हा गोंधळ वाढला अन् गोळीबारापर्यंत पोहोचला. यात प्रकाश दुरगुडे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Nilesh Ghaywal Gang Firing) आहे.

आरोपींवर संशय

प्राथमिक तपासात मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे या घायवळ टोळीतील सदस्यांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केला असून तीन राऊंड फायरिंग झाल्याचं कळतं. यामध्ये प्रकाश दुरगुडे यांच्या मानेला आणि पायाला गोळ्या लागल्या आहेत.

शिंदे चाळ परिसर हादरला

ही घटना कोथरूडमधील शिंदे चाळ परिसरात घडली. वाहनचालकाने घायवळ टोळीला साईड न दिल्याने टोळीतील गुंड संतापले. थेट कारमधील प्रकाश दुरगुडे यांच्यावर गोळीबार केला. काही सूत्रांनी एकाच राऊंड फायरिंग झाल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात तीन राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमी प्रकाश दुरगुडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. आंदेकर टोळीच्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच घायवळ टोळीने केलेल्या हल्ल्यामुळे पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

follow us