पुणे जिल्ह्यातून जनावरांचा चारा बाहेर नेण्यास बंदी; 8 तालुक्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pune fodder transport ban: पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांतून इतर जिल्ह्यांत चारा वाहतूक व विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

Pune fodder transport ban

Pune fodder transport ban

Pune fodder transport ban: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या 8 तालुक्यांतून इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर चारा नेण्यास आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांनी यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

कोणत्या चाऱ्याच्या वाहतुकीवर बंदी?

या आदेशानुसार सुका व ओला चारा, कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या सर्व प्रकारच्या चाऱ्यांची पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर वाहतूक आणि विक्री करता येणार नाही. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाची अधिकृत मंजुरी असलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी निर्णय

खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत आणि सीमावर्ती भागांत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक पातळीवर चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यताही प्रशासनाने लक्षात घेतली आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

जिल्हा प्रशासनाने जारी केलेले हे आदेश पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

Exit mobile version