Pune Graduate Election Result : वडिलांना आमदार होता आलं नाही पण, पवारांनी लेकीला आमदार केलं…

Harshada Deshmukh Jadhav पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या देशमुख यांच्या कन्येनं भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलाय.

Harshada Deshmukh Jadhav

Harshada Deshmukh Jadhav

Pune Graduate MLC Election Harshada Deshmukh Jadhav : भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला, अनुभवी राजकीय नेतृत्वाचं पाठबळ आणि एका निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कुटुंबाची विश्वासार्हता… पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत या सगळ्या घटकांची चर्चा रंगली. कारण, शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पुणे पदवीधर निवडणुकीत पराभव केलाय. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, वडिलांचा राजकीय-प्रशासकीय वारसा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद यांची सांगड घालत हर्षदा यांनी ही लढत लक्षवेधी बनवली. पण या विजयामागचं गणित नेमकं काय होतं? पवारांनी निवडलेली उमेदवार भाजपला कशी भारी पडली आणि हर्षदा यांच्या विजयाची इनसाईड स्टोरी नेकमी काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली, तेव्हा या लढतीत भाजपचा पारंपरिक प्रभाव कायम राहणार की, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा या मतदारसंघात आपली ताकद दाखवता येणार, या नजरेतून पाहिलं जात होतं. या निवडणुकीसाठी भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली, तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षदा देशमुख-जाधव यांच्यावर विश्वास टाकला.

हर्षदा यांचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीची चर्चा सुरू झाली. कारण हर्षदा यांची ओळख केवळ त्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवस्थापक म्हणून नव्हती. हर्षदा यांचे वडील प्रभाकर देशमुख हे राज्याच्या प्रशासकीय सेवेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले अधिकारी आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या निवडणुकीत हर्षदा यांची उमेदवारी म्हणजे एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याबरोबरच, देशमुख कुटुंबाच्या प्रशासकीय अनुभवाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याची संधी म्हणूनही पाहिली गेली.

पवारांनी निवडलेल्या उमेदवारीतच दडलं होतं विजयाचं गणित

शरद पवारांच्या राजकारणाची एक खासियत म्हणजे स्थानिक समीकरणं, व्यक्तींचा जनसंपर्क आणि राजकीय विश्वास यांचा मेळ घालून उमेदवार निवडणं आहे. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयानंतर आता या उमेदवारीकडेही याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. हर्षदा यांना उमेदवारी देताना पवारांच्या राष्ट्रवादीने केवळ नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवला नाही, तर प्रशासकीय अनुभवाची पार्श्वभूमी, शिक्षण क्षेत्रातील काम आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क या गोष्टीही विचारात घेतल्या. ज्याचा अंतिम निकाल जाधव यांच्या विजयाने झाल्याचे बोलले जात आहे.

आता हे झालं हर्षदा यांच्या उमेदवारीबाबत पण, हर्षदा देशमुख-जाधव यांच्या राजकीय प्रवासाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी त्यांचे वडील प्रभाकर देशमुख यांचा प्रवासदेखील जाणून घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. प्रभाकर देशमुख यांचं सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील लोधवडे गावाशी मूळ नातं आहे. त्यांनी 1982 मध्ये शासकीय सेवेला सुरुवात केली आणि मे 2017 मध्ये ते निवृत्त झाले. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्राचे कृषी आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त आणि जलसंधारण विभागातील सचिव अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुख्यमंत्री कार्यालयात विशेष सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं. बारामतीतील नियुक्तीपासून शरद पवारांशी त्यांचे संबंध जुळले आणि पुढे ते पवारांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले.

वडिलांना आमदार होता आलं नाही पण, पवारांनी लेकीला आमदार केलं 

प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर प्रभाकर देशमुख यांनी राजकारणात प्रवेश केला. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते माण-खटाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले. या निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली खरी पण, विजयाने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली पण, प्रभाकर देशमुख यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जातं. जाधव यांच्या या विजयानंतर 2019 मध्ये वडील प्रभाकर देशमुख यांना आमदार होता आलं नव्हतं पण, पवारांनी आता त्यांच्या लेकीला आमदार केल्याची चर्चा रंगली आहे.

हर्षदा देशमुख-जाधव यांची ओळख केवळ प्रभाकर देशमुख यांच्या कन्या म्हणून मर्यादित नाही. तर, त्यांनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रांत उच्च शिक्षण घेतलं आहे. पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असून, त्यानंतर अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षण आणि ब्रिटनमधील क्रॅनफिल्ड विद्यापीठातून फायनान्स अँड मॅनेजमेंटचं शिक्षणही त्यांनी घेतलं आहे. एवढेच नव्हे तर तर, त्यांचा पुण्यातील के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट समूहातही त्यांचा संबंध आहे.

भाजपचा बालेकिल्ला पण, यंदा समीकरण बदललं

पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व अनेक वर्षं राहिलं आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. चंद्रकांत पाटील यांनी तर, सलग दोन वेळा विजय मिळवल्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, 2020 मध्ये या समीकरणाला मोठा धक्का बसला. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण लाड यांना उमेदवारी दिली, तर भाजपने संग्राम देशमुख यांना मैदानात उतरवलं होतं. या लढतीत लाड यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि भाजपच्या पारंपरिक बालेकिल्याला खिंडार पाडलं. आता हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील ही लढत केवळ हर्षदा देशमुख-जाधव विरुद्ध स्मिता जाधव अशी नव्हती, तर भाजपचा पारंपरिक प्रभाव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उभं केलेलं पर्यायी राजकीय समीकरण यांच्यातील संघर्षही होता. पवारांसाठी जाधव यांचा विजय केवळ एका जागेपुरतं मर्यादित नसून, पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची पकड कायम असल्याचा संदेश देणारा आहे. तर, दुसरीकडे भाजपला आपल्या पारंपरिक मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा पुन्हा आढावा घेण्याची वेळ आली आहे हे सांगणारा आहे एवढं मात्र नक्की…

Exit mobile version