राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांडासंबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने आज पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 30) कोपर्डी घटनेतील मुख्य दोषी आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र याच दरम्यान जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली.
नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी कर्जत तालुक्याती कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकले होते. राज्यात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेसह तिघांनाही 29 नोव्हेंबर 2017 रोजी अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. यासाठी एक विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती.
या प्रकरणात मुख्य दोषी असलेला जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटेच्या सुमारास मात्र त्याने कारागृहातील बराकमध्ये गळफास घेतला. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहितीची मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.