Download App

पुण्यावर राष्ट्रवादीचा डोळा! काँग्रेसच्या बैठकीत घमासान, पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

Pune Lok Sabha : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला त्यानंतर काँग्रेसनेही आढावा सुरू केला आहे. शनिवारी यासंदर्भात मुंबईत काँग्रेस मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातला सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

पुणे लोकसभा मतदारसंघावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा मतदारसंघ सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याने राष्ट्रवादीनेही मागणी केली आहे. मात्र, पुणे लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला देऊ नये, अशी मागणी बैठकीत पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.

संजय राऊतांवर नाना पटोलेंची चुप्पी; न बोलण्यांच कारणही सांगून टाकलं

माजी आमदार रमेश बागवे यांनी देखील ही जागा काँग्रेसकडेच रहावी अशी मागणी केली. हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मतदारसंघात आधीच्या अनेक निवडणुकांत काँग्रेसला आघाडी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस हा तळागाळात रुजलेला पक्ष आहे. शहरात काँग्रेसचा मोठा मतदार आहे. त्यामुळे काही झाले तरी ही जागा काँग्रेसने सोडू नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

राष्ट्रवादीच्याही हालचाली 

तसे पाहिले तर पुणे शहर सोडले तर जिल्ह्यातील बारामती, शिरुर आणि मावळ हे तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे पुण्याची जागा काँग्रेसलाच रहावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

असे असले तरी सध्याची राजकीय गणित बदलली आहेत. या मतदारसंघात ताकद वाढल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. दीपक मानकर आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची नावे आघाडीवर आहेत. मध्यंतरी प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही लावले होते. अशा परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीने घ्यावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादीच्या या हालचाली काँग्रेसनेही हेरल्या आहेत. त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असा निर्धार व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी आग्रही होती. आताही पक्षाचा आग्रह कायम आहे. त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच होणार हे नक्की. पण, जागा कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us