पुणे मेट्रो लाइन 3 ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; 50 हजार प्रवाशांनी केला प्रवास…

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Pune Metro Train

Pune Metro Train

Pune Metro Trian News : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी (४ नोव्हेंबर) पहिल्याच दिवशी सुमारे ५० हजार प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरातील बहुतांश कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापने बंद असतानाही मेट्रो प्रवासासाठी नागरिकांनी मोठी पसंती दर्शविली. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर नियमित कामकाज सुरू झाल्यावर या मेट्रो मार्गाला आणखी मोठ्या संख्येने प्रवासी मिळण्याची अपेक्षा आहे.

या मार्गावर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरले. या स्थानकावरून दिवसभरात सुमारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. पुणे रेल्वे स्थानकासह शहराच्या विविध भागांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने या स्थानकावर प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ पाहायला मिळाली. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, “पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद झाला. मेट्रोची कनेक्टिव्हिटी, प्रवासातील आराम आणि कमी वेळेत इच्छितस्थळी पोहोचण्याच्या सुविधेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. पुणेकरांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर पुढील दोन आठवड्यांत कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर गर्दी कमी असलेल्या वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध करून दिली जाणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा संपूर्ण प्रवास सुमारे ४० मिनिटांत पूर्ण होणार असल्याने विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सुविधेलाही पहिल्याच दिवशी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. एकाच कार्डच्या माध्यमातून पुणे मेट्रोच्या सर्व मार्गांवर प्रवास करता येत असल्याने प्रवाशांनी या सुविधेचे स्वागत केले.

प्रवाशांच्या मागणीनुसार मेट्रोमधून सायकली नेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो आणि सायकल या दोन्ही पर्यायांचा वापर करून प्रवाशांना अंतिम टप्प्यातील प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासोबतच सार्वजनिक वाहतुकीशी पर्यावरणपूरक प्रवासाची जोड देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पुणे मेट्रो लाइन ३ साठी सकारात्मक सुरुवात ठरली आहे. वाढीव फेऱ्या, विविध प्रवासी सुविधा आणि शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणारी कनेक्टिव्हिटी यामुळे आगामी काळात ही मेट्रो पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय ठरण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version