Download App

‘भाऊंची आलेली चिठ्ठी म्हणजे आयुष्याचा ठेवा’, कार्यकर्त्याने जागवल्या आठवणी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज निधन झाले आहे. बापटांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सर्वंच स्तरातून गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली जात आहे. पुण्यातील (Pune News) एका भाजप कार्यकर्त्यांने बापटांच्या आठवणींना उजाळा देत कसबा पोटनिवडणुकदरम्यानचे (Kasba byelection) एक पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. त्यामध्ये ‘भाऊंची मला आलेली ही चिठ्ठी म्हणजे आयुष्याचा ठेवा’ असे म्हटले आहे.

पुणे भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ”1 फेब्रुवारी 2023…. भाऊंची मला आलेली ही चिठ्ठी म्हणजे आयुष्याचा ठेवा….प्रकृती बरी नसताना प्रचारात उतरणारे आणि मतदान करणारे लढवैय्या भाऊ सर्वांनी बघितले… पण मला दीनानाथ मधून अशी चिठ्ठी लिहिणारे भाऊ म्हणजे पक्ष निष्ठेचा दीपस्तंभ……. 40 वर्षांच्या स्नेहात मला जे भाऊ समजले ना ते हे…. माझ्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व कार्यकर्त्यांचा आधारवड, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे, सामान्य नागरिकांच्या ह्रदयात घर करणारे भाऊ, कामाचे नियोजन आणि नियोजनाप्रमाणे काम करणारे भाऊ, टिंगल मस्करी करत हसत खेळत कारभार करणारे भाऊ… टिंगल करताना, चिमटा काढतांना जखम होणार नाही याची काळजी घेणारे भाऊ…. समर्पित स्वयंसेवक, पक्षनिष्ठ, अफाट कष्ट घेणारे, पराभवा नंतर ही वैफल्यग्रस्त न होता नव्या जिद्दीने काम करणारे – नव ऊर्जे ने पुन्हा पराभव पचवून विजय मिळविणारे भाऊ…. नियती पुढे मात्र हरले….”

जाणून घ्या, गिरीश बापटांचा अल्पपरिचय

खासदार गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. गेल्या अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपणातही कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्याला त्यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. जनसंघापासून बापटांनी राजकीय प्रवास सुरु केला होता. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार, मंत्री आणि खासदार असा मोठा राजकीय प्रवास त्यांनी केला होता.

Tags

follow us