Pune News : पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी महापालिकेच्या आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण केली. या घटनेने मोठी खळबळ उडाल्यानंतर खुद्द आमदार महेश लांडगे यांनी माफी मागत वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आम्ही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे यांच्या कृत्याबद्दल पिंपरी-चिंचवडचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची माफी मागतो, अशा शब्दांत आमदार लांडगे यांनी भावना व्यक्त केल्या.
…तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? ड्रग्स रॅकेट प्रकारणावरुन रोहीत पवार यांचा उद्विग्न सवाल
दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे यांनी जमीन व्यवहाराच्या वादातून उद्योजक नरेश पटेल यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारातच बेदम मारहाण केली होती. यानंतर पटेल समाजाने थेट आमदार लांडगे यांनाच साकडे घातले होते. या प्रकरणात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित दीड हजार समाजबांधवांसमोर लांडगे यांनी या घटनेवर पटेल समाजाची माफी मागितली.
यानंतर पटेल बांधवांनीही तुम्ही माफी मागू नका. माफी मागण्याची काहीच गरज नाही असे सांगितले. त्यानंतर येणाऱ्या काळात उद्योजक, व्यावसायिक आणि भूमिपुत्र यांच्यात वाद होणार नाहीत. एकत्रितपणे शहराचा विकास करू असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले. नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांची येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन सामोपचाराने वाद मिटवण्यात येईल. यापुढील काळात असा प्रकार पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेणार आहोत, असे आमदार लांडगे यांनी यावेळी सांगितले.