Pune : महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षांचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील (Pune) विविध केंद्रांवर आज परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दीही झाली होती. मात्र पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थीनींना बार्टी चाचणी परीक्षेचे सील नसलेले पेपर दिले गेल. या प्रकारानंतर पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. असाच प्रकार नागपुरातही घडल्याने मोठी खळबळ उडाली असून या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी आणि महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका दिल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले होते. त्यांनी परीक्षा विभागाच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत परीक्षांवरच बहिष्कार टाकला. परीक्षा केंद्राबाहेर गोळा होत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा MBA चा पेपर फुटला, ‘या’ विषयाचा पेपर पुन्हा होणार
या प्रकरणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी काही आरोपही केले. मात्र विद्यापीठाच्या सेट विभागप्रमुखांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रश्नपत्रिका व्यवस्थित सील करूनच देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आमच्या बाजूने कोणतीही चूक झालेली नाही असा खुलासा विभागप्रमुखांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. यानंतर नागपूर शहरातही पेपर फुटीचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर शहरातील कमला नेहरू परीक्षा केंद्रावर पीएचडी फेलोशिप परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेतही पेपर फुटल्याने विद्यार्थी संतप्त झाले. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकत परीक्षा विभाागाच्या कारभाराचा निषेध केला. संपूर्ण परीक्षेचे पेपर आधीच फुटलेले होते. आम्हाला परीक्षेत झेरॉक्स कॉपी देण्यात आली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन सुरू केले आहे.
मोठी बातमी : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पूर्णविराम; हायकोर्टाच्या आदेशाला SC ची स्थगिती
दरम्यान, परीक्षांच्या पेपरफुटीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याआधीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला होता. हा प्रकार समोर येताच विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना पूर्णत: अयशस्वी ठरत असल्याचं या प्रकारावरून लक्षात येत आहे. त्यामुळं असे गैरप्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.